छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आणि संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आज (११ ऑक्टोबर) रस्त्यावर उतरला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हंबरडा मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी राज्य सरकारच्या मदतीच्या घोषणेवर जोरदार टीका केली आणि कर्जमुक्तीसाठी सरकारला खुले आव्हान दिले.
मोर्च्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, “पंधरा दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात शेतकऱ्यांना भेटलो. तेव्हाच जाहीर केले होते की, जोपर्यंत हे सरकार कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत सरकारला आम्ही सोडणार नाही.” “इतर वेळेला शिवसेना तुमच्यासोबत आहेच, पण ज्यावेळेस तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रति हेक्टरी मदतीची मागणी शेतकऱ्यांशी बोलूनच केली असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. सरकारने जाहीर केलेले ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी अमान्य असल्याचे सांगत त्यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “पॅकेज पाहिल्यावर सगळ्यांना असं वाटलं की इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज आहे. पण नाही, ही इतिहासातली सर्वात मोठी थाप आहे! आजपर्यंत इतकी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारलेली नाही. इतकी मोठी थाप देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मारलेली आहे.”
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला उद्देशून ५० खोक्यांवरून पुन्हा एकदा टीका केली. “पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागत आहोत? तर ५० खोके ज्यांनी घेतले आहेत त्यांच्याकडे मागत आहोत.” ते सहजासहजी वठणीवर येणार नाहीत, त्यांना चाबूक हातात घेऊन वठणीवर आणावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा उल्लेख करत त्यांनी सरकारची खिल्ली उडवली. “राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असे आपण म्हणत होतो, पण आता शेतकऱ्यांनी सांगितले की, साहेब हातात टरबूज दिला! ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे.”
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मदतीच्या घोषणेवर थेट आव्हान दिले. “मी या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे.” मुख्यमंत्री म्हणाले होते की, खरडून गेलेल्या जमिनीला मनरेगातून साडेतीन लाख रुपये प्रति हेक्टरी देणार आहोत. यावर ठाकरे म्हणाले, “तुमची नियत असेल तर दिवाळीपूर्वी तीन लाखातील एक लाख रुपये माझ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करा,” असे आव्हान त्यांनी दिले.
ठाकरे यांनी कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सरकारच्या निर्णयावरही टीका केली. “आम्हाला हे पुनर्गठण नको आहे. आजचं मरण उद्यावर नको. आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आहे.” “मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्त करून दाखवले होते, त्यामुळे मला अधिकार आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी सरकारला इशारा दिला. “जर तुम्ही कर्जमुक्त केली नाही, तर आम्ही फक्त मराठवाडा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही,” असे सांगत त्यांनी ‘कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे,’ ही मागणी लावून धरली.




