जालना | Jalna
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची शनिवारी सांगता झाली. चार दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे फटका बसलेल्या भागांची पाहणी केली.
दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार प्रहार केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सरकार खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, असा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्यातील महायुती सरकारकडे दोन कुबड्या फेकण्याची देखील हिंमत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची क्षमता आणि संवेदनशीलता या सरकारमध्ये उरली नाही.” त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना स्पष्ट शब्दांत म्हटले की, “शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत महायुतीला व्होटबंदी करा.”
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या भागांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. अतिवृष्टीने हजारो एकरवरील पिके नष्ट झाली असून अनेक शेतकरी कर्जाच्या जोखडात अडकले आहेत. ठाकरे म्हणाले, “आजही अनेक गावांमध्ये पंचनामे झालेल्या नाहीत. पीकविम्यातून शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. हा पीकविमा म्हणजे शेतकऱ्यांची उघडपणे थट्टा आहे.” त्यांनी पुढे मागणी केली की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, शेतकरी कर्जमुक्त व्हावा आणि प्रति हेक्टर किमान ५० हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी. तसेच पिकाला हमीभाव दिला न गेल्यास शेतकरी अडचणीतून बाहेर पडू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी प्रशासनावरही टीका केली. “नुकसान झालेल्या भागांमध्ये पंचनामे वेळेवर होत नाहीत. अनेक ठिकाणी यादी तयार केली जात नाही. त्यामुळे मदत मिळण्यात होणारा विलंब शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांनी आता जागरूक व्हावे. पंचनाम्याच्या वेळी स्वतः उपस्थित राहा. कार्यालयात जाऊन तपासा. नुकसान दाबण्याचा प्रयत्न कुठे होत नाही ना याची पाहणी करा. सरकार मदत देईल तेव्हा शेतकरी मागे राहू नये. मुख्यमंत्री सध्या बिहारमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या वेदना कळणार तरी कशा? शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अन्यायाची परिसीमा आहे,” असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजप आणि त्यांच्या नेतृत्वावरही निशाणा साधला. “भाजपने देशाची लूट थांबवली पाहिजे. शेतकऱ्यांना एकरकमी मदत देणे आवश्यक आहे. देश लुटणाऱ्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही,” अशी कडवी टीका त्यांनी केली. त्यासोबतच त्यांनी विखे पाटील कुटुंबावर अप्रत्यक्ष निशाणा साधत, “विखेंचे घोटाळे सर्वांना माहीत आहेत. अशा लोकांना बोलण्याचा अधिकार नाही,” असे म्हटले.




