मुंबई | Mumbai
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एकत्र येत वचननामा जाहीर केला. मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या शिवशक्तीचा वचननामा आज प्रसिद्ध झाला. ठाकरे बंधूंनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेत ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा जाहीर केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधुंनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज शिवसेना-मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वचननामा जाहीर झाला. त्यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निलंबन करण्याची मागणी केली.
वरळी डोममध्ये काल डोमकावळे जमले होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वरळीतील महायुतीच्या सभेवरुन जोरदार टीका केली. मुंबईतील महापौर मराठीच होणार असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील छोट्या कामाचा श्रेय घेण्यापेक्षा मोठ्या कामाचा श्रेय घ्यावे, अरबी समुद्र, गंगा आणली, कैलास पर्वत तुम्ही निर्माण केला हे श्रेय घ्या. समुद्रमंथन तुम्हीच आणला, अशी फटकेबाजी उद्धव ठाकरेंनी केली.
“मोदीजी जर तुमची छाती…जर ट्रम्प करु शकता तर तुम्ही का नाही?”; ओवैसींची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी
राहुल नार्वेकरांचे अध्यक्षपदावरुन निलंबन केले पाहिजे
देशात लोकशाही संपून झुंडशाही सुरु आहे असे वातावरण आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडल्यानंतर आता उमेदवारांची पळवापळवी सुरु केली आहे. निगरगट्ट राज्यकर्ते याआधी लाभले नव्हते. बिनविरोधसाठी जे सुरु आहे ते चुकीचे आहे. राहुल नार्वेकर यांचा विषय निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतला पाहिजे आणि त्यांचे तात्काळ अध्यक्षपदावरुन निलंबित केले पाहिजे. प्रचाराला जात छेद देणारे कृत्य त्यांनी केले आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
“राहुल नार्वेकर हे आमदार अधिकारांचा दुरूपयोग करत आहे. हा विषय गांभीर्याने घेऊन अध्यक्षांना निलंबित करायला हवे. अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी जाऊ शकत नाहीत. हे उद्दाम वर्तन आहे. स्वत:ला नायक चित्रपटातील अनिल कपूर समजतात. संरक्षण काढून घेण्याचा अधिकार त्यांना नसतो. दमदाटी करून बिनविरोध निवडणुका केल्या. मतदारांना मतदानाचा अधिकार नाकारला आहात. पुन्हा निवडणूक प्रक्रिया तिथल्या घेतल्या गेल्या पाहिजेत. निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांचे गुलाम समजले जातील,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नाही
“सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नाही. उद्या तुम्ही गेल्यानंतर जेव्हा दामदुपटीने सगळे सुरु होईल तेव्हा त्याची तक्रार करु नका. आपण सत्तेतून कधी बाजूला होणार नाही असे वाटत असेल तर तो भ्रम दूर झाला पाहिजे. जेव्हा दुसरे सत्तेत आल्यानंतर याहून वाईट होईल त्याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करायला हवा. आपण चुकीचे पायंडे पाडत नाही ना याचा नीट विचार केला पाहिजे. हे महाराष्ट्राचं युपी, बिहार करत आहेत हे मी १० वर्षांपासून सांगत आहे. अशा प्रकारे वाटोळं करणं, राजकारणात येणाऱ्यांची विचारसरणी बदलणे हे घातक आहे. आज जर प्रोत्साहसन दिले तर नंतर काय वाट्याला येणार आहे हे ओळखावे,” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.




