मुंबई | Mumbai
काश्मीर हे आपले आहे. काश्मीर कालही आपले होते, आजही आपले आहे आणि उद्याही आपलेच राहील. एकवेळ देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलेच राहील, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत भारत आणि पाकिस्तान तणावावर भाष्य केले. याचवेळी, देशावर संकट आले तर आम्ही कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असू, अशी भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. ते शनिवारी शिवसेना भवनात आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षाची स्थिती आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या संघर्षावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाकरे यांनी आज झालेल्या बैठकीत या संघर्षावर भूमिका स्पष्ट केली आहे.
आपला वैचारिक विरोध असेल पण देशावर काही संकट आले तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्यासोबत असू. आम्ही देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात आहोत. ‘वन नेशन वन इलेक्शन’चा अभ्यास सुरु आहे, कमिटी महाराष्ट्रात आहे पण निवडणूक ही पारदर्शकपणे घ्या. वन नेशन वन इलेक्शन करतायत ते ठीक आहे. पण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी प्रचारात उतरू नये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केला, ते म्हणाले, आमचे जहाज बुडणारे नाही. तर भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज हे बुडणारे आहे. अमित शहा हे तीन पक्षांचे प्रमुख आहेत. ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. सत्ता येते व जाते. सत्ता आल्यावर हुरळून जायचे नाही व सत्ता गेल्यावर दु:ख नाही करायचे. परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट,प्रयत्न करायचे असतात. ज्यांना आपण खूप काही दिलं ते पक्ष सोडून जात आहेत. ते पक्ष सोडून गेले तरी आपल्या पक्षावर काही परिणाम होणार नाही. ज्याला सोडून जायचं त्याला जाऊ द्या. कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी तयारीला लागवे, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा