मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अंतिम टप्प्यातील या जागावाटपावरुन पक्षांमध्ये कुरबुरी आणि ओढाताण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद झाल्याचे समजते. या वादाबद्दल विचारले असता उद्धव ठाकरेंनीही काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जागांची खेचाखेची तुटेपर्यंत ताणायची नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, असे सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे.
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांना पटोले आणि राऊत यांच्यातल्या वादाबद्दल विचारलं, तेव्हा मी माहिती घेईन आणि तुमच्याशी बोलेन, असे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले. ‘एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा जागांची खेचाखेची होते, पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही, हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवायला पाहिजे. अजूनही तंटा बखेडा झाला आहे, असे माझ्या कानावर आलेले नाही. माझ्या कानावर येईल तेव्हा मी नक्कीच त्यावर भाष्य करेन. दुसरीकडे शरद पवार यांनीही मध्यस्थीसाठी दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करुन चर्चा केल्याची माहिती आहे. दरम्यान, उद्या तर उद्या किंवा दोन ते तीन दिवसांत महाविकास आघाडीतील जागावाटप होईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
दिपक साळुंखेंचा पक्षप्रवेश
उद्धव ठाकरे म्हणाले की, दसऱ्यानंतर आज पहिल्यांदा बोलतोय, मधल्या काळात हॉस्पिटलची वारी करावी लागली. डॉक्टर म्हणाले आराम करा, पण आधी हरामांना घालवायचे आहे. मुहूर्त चांगला आहे. आबासारखा मजबूत गडी शिवसेना परिवारात सामील झाला आहे. आबांच्या हाती मशाल दिली आहे. ही मशाल कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायचे हे तुम्ही ठरवायचे. दीपक आबा आले म्हणजे विजय नक्की हे मला माहिती आहे. पण तुम्ही आजपासून संपूर्ण मतदारसंघात घराघरात आपली मशाल पोहचवली पाहिजे. कारण हे गद्दार आहेत ते खोके घेऊन बसले नाहीत तर धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम ते निर्माण करतात. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल आहे ही आतापासूनच तुम्हाला घराघरात न्यावी लागेल असे आवाहन त्यांनी केले.
मशालीची धग तुम्हाला दाखवून द्यायची आहे
“तुम्ही दीपक आबा यांना उमेदवारी जाहीर करा म्हणतात, पण आपण अजून उमेदवारी कुणाला जाहीर केलेली नाही. मी फक्त एवढे सांगेन की, दीपक आबांच्या हाती मशाल दिलेली आहे. मशालीची धग ही तुम्हाला दाखवून द्यायची आहे. मी सभेला येईल तेव्हा विस्ताराने बोलेनच. तूर्तास मी तुमचे पक्षात स्वागत करतो. तुमच्याकडून म्हणजे माझा सांगोल्याचा आमदार जो निवडून आला होता तो जरी गद्दार झाला तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहेत हे तुम्ही दाखवून द्यायचे आहे. मला खात्री आहे की, तुम्ही या शब्दाला जागाल आणि आपला आमदार निवडून आणाल. जिंकून आणल्यानंतर परत एकदा येईन. तोपर्यंत शुभेच्छा देतो”, असे उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा