मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाला गेल्या अनेक दिवसात अनेकांनी राम राम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंना समर्थन दिले. त्यानंतर कोकणातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उद्धव ठाकरेंना सोडून गेले. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना गेल्या अनेक दिवसांत धक्क्यांवर धक्के बसत आहे. अशा धक्क्यांमुळे मी आता धक्कापुरुष झालोय, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.
शिवसेना ठाकरे गटात मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांचे गुरुवारी पक्षप्रवेश झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करताना त्यांना संबोधित केले.
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
जपानमध्ये भूकंपाचा धक्का बसला नाही तर लोक आश्चर्य व्यक्त करतात, तसे माझे झाले आहे. मला धक्का बसला नाही तर कसे? रोज धक्का बसून मी आता धक्कापुरूष झालो आहे, असे मिश्किल विधान करीत ज्यांना कुणाला धक्के द्यायचे आहेत, त्यांना देऊ देत. आपण एकच धक्का असा देऊ की पुन्हा यांची हिम्मत झाली नाही पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
आपापसातील रुसवे फुगवे बाजूला ठेवा
उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या मुळावरती घाव घालायले काही लोक सरसावले आहेत. आपल्याच लाकडाचा दांडा वापरून त्या कुऱ्हाडीने शिवसेनेवर आणि मराठी माणसावर घाव घालतायेत. त्यामुळे आपापसांत असलेले रुसवे फुगवे बाजूला ठेवा. ही लढाई एकट्या दुकट्याची नाही, ही लढाई आपणा सर्वांची आहे. आपण एक नाही राहिलो तर कंपाळ करंटे ठरू. संघटनात्मक बांधणी करण्याचे दिवस आहे, आपण ती करु आणि निवडणुकांना हिमतीने सामोरे जाऊ.
महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये लागू शकते
संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत. सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे. २७७ किंवा २३६ चा निकाल लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. मग सर्वांना दिलेले ती काम सर्वांनी करा. शाखेनुसार काम करा. विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक होणार नाही महापालिकेला तिन्ही वॉर्ड आता शिवसेनेचेच असले पाहिजे, अशा सुचना उद्धव ठाकरेंनी केल्या.
सगळ्यांनी छावा बघा
दुसरीकडे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छावा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. छावा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहा, लोक डोळे पुसत चित्रपटगृहाच्या बाहेर पडतायेत, पण डोळे उघडे ठेवून चित्रपट पाहा, असे ठाकरे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा