मुंबई | Mumbai
ज्येष्ठ सरकारी वकील आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ॲड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आणि निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता राष्ट्रपती कोट्यातून त्यांना संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
नियुक्तीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उज्ज्वल निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, “पंतप्रधानांनी माझ्याशी मराठीत संवाद साधला आणि मला सांगितले की, राष्ट्रपती महोदय तुमच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवत आहेत. ही जबाबदारी तुम्ही देशहितासाठी उत्तमरित्या पार पाडाल, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.”
राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, याची जाणीव निकम यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “कायद्याचा सखोल अभ्यास आणि विश्लेषण करून देशाच्या एकतेसाठी, लोकशाहीच्या मजबुतीसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी मी माझ्या पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन. महाराष्ट्रातून माझी एकट्याचीच निवड झाली आहे, त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मी मनापासून आभारी आहे.” तसेच, महाराष्ट्रातील जनता आणि इतर भाषिकांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निकम यांनी दहशतवाद्यांविरुद्ध अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये यशस्वीपणे काम केले आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत देश एकसंघ आहे, हे दाखवण्यासाठी मी विधायक काम करेन. यासाठी सर्वांच्या शुभेच्छा आणि सहकार्याची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य करताना निकम यांनी सांगितले की, निवडणुकीदरम्यान गैरसमज पसरवण्यात आले. “काहींनी असा खोटा प्रचार केला की, कसाबच्या गोळीने शहीदांच्या हत्या झाल्या नाहीत. मात्र, महाराष्ट्रातील साक्षर जनतेने विधानसभा निवडणुकीत अशा खोट्या प्रचाराला नाकारले. राजकीय पक्षांनी जनतेची साक्षरता लक्षात ठेवावी,” अशी सूचना त्यांनी केली.
उज्ज्वल निकम यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, प्रख्यात इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन आणि केरळमधील समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्टर यांचीही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. हर्षवर्धन श्रृंगला यांनी परराष्ट्र धोरणात मोलाचे योगदान दिले आहे, तर डॉ. मीनाक्षी जैन यांचे भारतीय इतिहासावरील अभ्यासग्रंथ प्रसिद्ध आहेत. सी. सदानंदन मास्टर यांनी शिक्षण आणि समाजसेवेत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.




