उक्कलगाव |वार्ताहर| Ukkalgaon
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे डंपर-दुचाकीच्या झालेल्या धडकेत एका शेतकर्याचा जागीच मुत्यू झाल्याची घटना सोमवारी सांयकाळी वाकण वस्ती शिवारात घडली. शेतकरी बाळासाहेब सारंगधर कवडे (वय 64, रा.माहेगाव, ता.राहुरी) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उक्कलगाव-कोल्हार रस्त्यावर वाकणवस्ती येथे रात्री (एचएच 14 बीजे 2639) हा डंपर सोमवारी रात्रीच्या वेळी मधोमध रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभा करण्यात आला होता. त्यावेळी डंपर चालकांनी साईट कॉर्नरचे लाईट लावलेले नव्हते. त्यानेही या परिस्थितीची कोणतेही काळजी न करता बेवारसपणे वाहन रस्त्यावर उभे केलेले होते. अशावेळी दुचाकीवरून बाळासाहेब कवडे हे आपल्या वडिलांना भेटून माहेगावकडे घरी परतत असताना ते उभ्या असलेल्या डंपरला धडकले. या अपघातात श्री. कवडे यांचा जागीच मुत्यू झाला.
स्थानिक नागरिकांनी तात्काळ श्रीरामपूरहून रुग्णवाहिका बोलाविली. परंतू, त्याआधीच मालुंजे येथील नागरिकांनी श्री. कवडे यांना वाहनातून लोणी येथे हलविले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचाराआधीच मयत घोषित केले. मयत कवडे हे लोणी रूग्णालय येथून वडिलांचे बील भरून, घरी चालले होते. मंगळवारी दुपारी वडिलांना डॉक्टर लोणी रूग्णालयातून डिस्चार्ज देणार होते. त्याआधीच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. नियमाबाह्य वाहतूक करणारे डंपरचालक कोल्हार रस्त्यावर भरधाव वेगाने डंपर चालवितात.
यामुळे या घटनेमध्ये निष्पाप लोकांचे बळी जात आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहनाने बेलापूर पोलीस चौकीत लावण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मयत कवडे यांची पांढरी टोपी व चप्पल घटनास्थळी पडून होत्या. डंपर हा मुरुम वाहतूक करणारा असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सदर वाहन कोणाचे आहे याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहिणी असा मोठा परिवार असून माहेगावचे विद्यमान सरपंच स्वाती संदिप कवडे यांचे ते सासरे होत. माहेगाव येथील अमरधामात शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अत्यंसस्कार करण्यात आले.




