श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
मोदी आवास योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्याची योजना शासनस्तरावर युध्दपातळीवर सुरू असली तरी स्थानिक पातळीवर नावे खाली वर करण्याच्या सावळ्या गोंधळासह अर्थपूर्ण तडजोडी होत असल्याचा संशय ग्रामस्थांना आल्याने काही तरुण ग्रामस्थ दोन दिवसांत माहिती अधिकारात माहिती मागवून या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत असल्याचे विशवसनीय वृत्त आहे. शनिवारी घरकुल लाभार्थ्यांची 2024-25 वर्षांसाठीची मंजूर यादी फलेक्स बोर्डवर प्रकाशीत झाल्यानंतर यादीत आपले नाव असेल या आशेने गरजू लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांची घोर निराशा झाल्याने त्यांना हात हलवत माघारी फिरावे लागले. कारण स्वत:चे नाव तर सोडाच चक्क बंगल्यावाल्यांची नावे घरकुल यादीत बघून त्यांची पाचावर धारण बसली.
मात्र याचे श्रेय घेणारा हंगामी कर्मचारी मात्र, आपण मोठा तीर मारला अशा आविर्भावात गावभर ओरडत फिरत आहे. माझ्या सहीशिवाय तुमचे घरकुल मंजूर होऊ शकत नाही असा त्याचा स्वयंघोषित दावा आहे. यावर कळस म्हणजे घरकुलाची कागदपत्रे ग्रामपंचायतीने गोळा करण्याऐवजी या कर्मचार्यानेच घरोघरी तोंडी आमंत्रण देऊन गोळा केली. आणि काही स्थानिकांना हाताशी धरून यादीत फेरफार केला. अर्थात हा प्रकार प्रशासकीय काळापासून सुरू असला तरी आता त्यावर कळस चढल्याने ग्रामस्थ जागृत झाले आहेत. विशेष म्हणजे सुनीता गोरक थोरात या नावाच्या दोन महिला असून या नावाने घरकूल मंजुरी आली असता कागदपत्रे एकाची सबमीट केली तर आयडी दुसर्या नावाने आहे. त्यामुळे कालच्या घरकुल यादीतून हे नाव आश्चर्यकारकरित्या गायब झाल्याचे दिसून आले. याचप्रकारे अगोदर कागदपत्रे देऊन आघाडीवर असलेल्या अनेकांच्या तोंडाला ‘ त्या’ दोन कर्मचार्यांनी पाने पुसली असून आपल्या सलगीतल्या लोकांची घरकुले नजिकच्या काळात मंजूर करून घेण्याच्या तयारीत ते असल्याची खात्रीलायक माहिती असून ‘तो’ कर्मचारी कधी हा उद्योग करतो याकडे तरुण ग्रामस्थ डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत.
किती घरकुले मंजूर झाली अन् किती पाठवली याची यत्किंचीतही माहिती नसल्याचे सांगून ग्रामपंचायतचे हेड क्लार्क हात झटकत आहेत. नवीन कमेटी आल्यापासून वर्षभरात तीन ग्रामसेवक बदल्याने कुणालाच कुणाचा ताळमेळ लागत नाही. सगळे एकमेकांकडे बोट दाखवत असून या गोंधळात मात्र तो कर्मचारी उजळ माथ्याने फिरून घरकूल माझ्याच हातात आहे, असे सांगत आहे.कागदपत्रे गोळा करून ज्यांच्याकडून काही मिळणार नाही त्यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचेही काहीजण बोलत आहेत. विशेष म्हणजे वरूनच यादी आली आम्ही त्यात हस्तक्षेप करत नाही असे हा कर्मचारी सांगत असला तरी प्रत्यक्षात यादीत प्रचंड गोंधळ असल्याचे सिध्द करायला अनेक तरुण तयार आहेत.
याला ग्रामपंचायत पदाधिकारी जबाबदार नसले तरी प्रशासकीय काळात सर्व्हे झालेली ‘ड’ यादी निवडणूक काळात घाईघाईने मंजूर करण्यात आली आहे. त्याला ग्रामसभेत मंजुरी घेतली किंवा नाही? हेही कळायला मार्ग नसल्याने माहिती अधिकाराचा वापर करून या प्रकरणाचा पर्दाफाश कण्याची अनेकांनी तयारी केली आहे. जवळपास सात ते आठ बंगल्यावाले घरकुल लाभार्थी यादीत आहेत. त्यांना लाभ मिळाला याच्याशी कुणाचे दुमत नसले तरी घरकुल योजना कोणत्या निकषाच्या आधारे राबवली जाते? की या योजनेला निकषच नाही? पक्क्या घरावाल्यांना रोखीने पैसे देणार का? याचीही पोलखोल केली जाणार आहे.
26 जानेवारीच्या ग्रामसभेत जोपर्यंत ग्रामपंचायतीची कमान होणार नाही व सि.सि.टिव्ही. बसवले जाणार नाहीत तोपर्यंत मासिक सभेला येणार नाही, अशी भूमिका ग्रा.पं.सदस्य दिलीप मारुती थोरात यांनी जाहीरपणे घेतली आहे. त्यामुळे आजच्या मासिक सभेला ते उपस्थित राहणार का? याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.
घरकुल यादीत फेरफार केल्याची माहिती प्राप्त झाली असून, त्याची वस्तुनिष्ठ चौकशी करून अन्यायग्रस्तांच्या पाठिमागे उभे राहू, गरजवंतांना प्राधान्याने घरे मिळावीत ही आपली प्रामाणीक भूमिका आहे.
– अॅड.पुरुषोत्तम थोरात ( ग्रा.पं.सदस्य)
घरकुल यादीत फेरफार पदाधिकार्यांनी नव्हे तर प्रशासकीय काळात झाल्याचा संशय आहे. त्याच्या मुळाशी जाऊन सामान्य लाभार्थ्यांना न्याय द्यावा लागेल. ते आमचे कर्तव्य आहे.
– रवींद्र कृष्णाजी थोरात (माजी उपसरपंच)