नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आवाहन धुडकावत शनिवारी रात्री रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला केला. युक्रेनियन हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, रशियाने कीववर ३६७ शस्त्रांनी हल्ला केला. त्यामध्ये ९ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ६० क्रूझ क्षेपणास्त्रे आणि २९८ ड्रोनचा समावेश होता. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला असून यात तीन मुलांचा समावेश आहे. तर १२ जण जखमी झाले आहे.
रविवारी माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की युक्रेनमधील हवाई हल्ल्यांमुळे ते पुतिनवर नाराज आहे. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आमचे चांगले संबंध आहेत. मात्र, आता ते रॉकेट्स डागत आहेत. हे मला अजिबात मान्य नाही. ते क्रेझी व्यक्ती आहेत. हे योग्य नाही.” एवढेच नाही, तर ट्रम्प यांनी पुतीन यांच्यासाठी ‘व्हाट द हेल’ सारखे शब्दही वापरले.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 19, 2025
दक्षिण युक्रेनमधील मायकोलाईव्ह येथे रशियन ड्रोन हल्ल्यात एका वृध्दाचा ही मृत्यू झाला आहे. याशिवाय, एका सोसायटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इमारतीभोवती सर्वत्र कचरा पडला आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनीयन पंतप्रधान व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा अमेरिकेवर निशाणा साधला आहे. या हल्ल्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
झेलेन्स्की म्हणाले की, अमेरिका आणि जगाचे मौन व्लादिमीर पुतिन यांना प्रोत्साहन देत आहे. रशिया युक्रेनवर दहशतवादी हल्ले करत आहे. दबावाशिवाय काहीही बदलणार नाही. रशिया आणि त्यांचे मित्र राष्ट्रे पाश्चात्य देशांमध्ये उद्वस्त करत राहतील.
रशियाने दावा केला आहे की युक्रेनने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे हेलिकॉप्टर पाडण्याचा प्रयत्न केला. रशियन हवाई दलाचे मेजर जनरल युरी दश्किन यांच्या मते, पुतिन यांनी २० मे रोजी कुर्स्कला भेट दिली. डश्किन म्हणाले की या काळात युक्रेनियन हवाई दलाने पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर ४६ ड्रोनने हल्ला केला पण आम्ही सर्व ड्रोन पाडले. दश्किन म्हणाले की, आम्ही एकाच वेळी अनेक ड्रोनशी लढलो आणि राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरची सुरक्षितता सुनिश्चित केली.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनने २४ मे रोजी प्रत्येकी ३०७ कैद्यांची देवाणघेवाण केली. तीन वर्षांच्या युद्धातील ही सर्वात मोठी कैदी देवाणघेवाण आहे. रशियन संरक्षण मंत्रालय आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी टेलिग्रामवर या देवाणघेवाणीची माहिती दिली. झेलेन्स्की यांनी लिहिले की, आणखी सुटका अपेक्षित आहे, आमचे ध्येय प्रत्येक युक्रेनियनला रशियन कैदेतून परत आणणे आहे. यापूर्वी २३ मे रोजी दोन्ही देशांनी प्रत्येकी ३९० कैद्यांना सोडले. तीन दिवसांत दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १ हजार कैद्यांची सुटका केली जाणार आहे. ट्रम्प म्हणाले की ही देवाणघेवाण मॉस्को आणि कीवमधील शांतता कराराच्या प्रयत्नांमध्ये एक नवीन टप्पा सुरू करू शकते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा