अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात महानगरपालिका प्रशासनाने 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर 711 फलकांवर कारवाई करत 34 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली.
अनधिकृत फ्लेक्स बोर्ड संदर्भात कारवाईसाठी न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनामार्फत सातत्याने आढावा घेऊन अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक अशा ठिकाणी काही संस्था, नागरिक, व्यावसायिक आस्थापना, राजकीय कार्यकर्ते महानगरपालिकेची परवानगी न घेता फ्लेक्स बोर्ड लावत आहेत. महानगरपालिकेने याची तपासणी करून गेल्या महिनाभरात अनधिकृत फ्लेक्स लावणार्यांवर कारवाई केली आहे. तसेच, महानगरपालिकेमार्फत शहरात तात्पुरते फलक लावण्यासाठी तीन दिवसांसाठी 134 फलकांना तात्पुरत्या परवानग्या दिल्या आहेत.
त्या पोटी महानगरपालिकेला 86 हजार 364 रुपये शुल्क प्राप्त झाले आहे. महानगरपालिका क्षेत्रात फलक लावण्यासाठी नागरिक, संस्था, व्यवसायिक आस्थापना, राजकीय कार्यकर्त्यांनी रीतसर अर्ज करून व शुल्क भरून परवानगी घ्यावी. शहरात विनापरवाना फलक आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.