Tuesday, January 27, 2026
Homeनगरएकरूखे शिवारात अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांतून संताप

एकरूखे शिवारात अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांतून संताप

एकरूखे । वार्ताहर

राहता तालुक्यातील एकरूखे परिसरात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने सोमवारी खळबळ उडाली. राहता-चितळी रस्त्यापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध वज्रेश्वरी माता मंदिर परिसरातील पटांगणात ही घटना घडली. प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजी सकाळी ही बाब उघडकीस आली.

- Advertisement -

वज्रेश्वरी देवीचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी दररोज सकाळी परिसरातील ग्रामस्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. २६ जानेवारी रोजी सकाळी काही ग्रामस्थ दर्शनासाठी आले असता, त्यांना मंदिरासमोरील पटांगणात एक महिला झोपलेल्या अवस्थेत दिसून आली. बऱ्याच वेळ उलटूनही महिलेची हालचाल होत नसल्याने ग्रामस्थांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मृताचे अंदाजे वय ६० ते ६५ वर्षे असून, तिच्या अंगात पंजाबी ड्रेस आणि त्यावर स्वेटर घातलेला होता. ही महिला नेमकी कोण आहे आणि तिचा मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

YouTube video player

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती एकरूखेचे सरपंच जितेंद्र गाढवे यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सरपंचांनी ग्रामपंचायत लिपिक आप्पा तुपे आणि अमोल गोरे यांना प्रत्यक्ष घटनास्थळी पाठवून खात्री करण्यास सांगितले. या कर्मचाऱ्यांनी महिला मृत असल्याची पुष्टी केल्यानंतर सरपंचांनी तातडीने राहता पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

या घटनेची माहिती देऊनही राहता पोलिसांनी घटनास्थळी येण्याबाबत अनास्था दाखवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी केवळ वाहन पाठवले, मात्र स्वतः घटनास्थळी येण्याची तसदी घेतली नाही. विशेष म्हणजे, अशा संवेदनशील प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया म्हणून ‘स्पॉट पंचनामा’ करणे आवश्यक असताना, पोलिसांनी तो केला नसल्याचे समोर आले आहे.

उलटपक्षी, संबंधित मृतदेह ‘बेवारस’ असल्याचे पत्र ग्रामपंचायतीकडून लिहून घेण्यावरच पोलिसांनी भर दिल्याचे समजते. एखाद्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास त्याची कायदेशीर नोंद आणि घटनास्थळाची पाहणी होणे अनिवार्य असते. मात्र, राहता पोलिसांनी ही प्राथमिक कर्तव्ये पार न पाडल्याने आणि साधा पंचनामाही न केल्याने एकरूखे येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी

Girish Mahajan: मी दिलगीरी व्यक्त केली, मग एवढे कशासाठी? ॲट्रॉसिटी दाखल...

0
मुंबई | Mumbaiनाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे....