अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
समग्र शिक्षा अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून राज्य शासनाला गणवेश, पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध प्रकारच्या साहित्यासाठी कोट्यवधींचा निधी देण्यात येतो. मात्र, त्यानंतरही सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत अपेक्षेनुसार वाढ दिसूत येत नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारने शाळा आणि विद्यार्थ्यांचे सामाजिक अंकेक्षण (सर्वेक्षण) करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानूसार राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हे सामाजिक सर्वेक्षण सुरू आहे. राज्यात सध्या 13 हजार शाळांमध्ये तर नगर जिल्ह्यात संगमनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 712 शाळांमध्ये असे असे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात संबंधीत नेमण्यात आलेले पथक हे शाळा पातळीवर जावून त्या ठिकाणी देण्यात आलेल्या निधीतून भौतिक सुविधा उभ्या राहिल्या की नाहीत. त्या ठिकाणी गणवेश, पाठ्य पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य पोहच झाले की नाही. याची माहिती थेट विद्यार्थी, पालक यांच्याकडून घेत आहे. या सामाजिक सर्वेक्षणात घेण्यात येणारी माहिती केंद्र सरकारने विकसीत केलेल्या अॅपमध्ये भरण्यात येत असून संबंधीत शाळेच्या व्यवस्थापन समितीसमोर घेण्यात आलेल्या माहितीचे वाचन करण्यात येत आहे. तपासणी करण्यात आलेल्या शाळांचे लवकर तालुका पातळीवर जनसुनावणी घेण्यात येणार आहे.
राज्य सरकारने यासाठी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शता सोसायटीसोबत सामंजस्य करार केला आहे. समग्र शिक्षण योजनेच्या अंतर्गत राज्यात 65 हजार शाळांना दिल्या जाणार्या लाभांचे अंकेक्षण होईल. पहिल्या टप्प्यात राज्यात 13 हजार शाळांमध्ये या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एकूण शाळांच्या 20 टक्के शाळांची यासाठी निवडही करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 712 शाळांची या सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली होती.
केंद्र सरकारकडून शाळा दुरुस्ती, गणवेश, पुस्तके आणि इतरही कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येतो. परंतु काही राज्यांकडून जिल्हास्तरावर वेळेत निधी देण्यात येत नाही. तर राज्याने वेळेत निधी दिल्यास शिक्षण विभागाकडून तो खालच्या स्तरावर वळता करण्यात येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके पहिल्यात दिवशी मिळत नाही. काही राज्यात विद्यार्थ्यांना एकच पुस्तक व गणवेश देण्यात आले. मात्र, कागदोपत्री सर्वच विद्यार्थ्यांना ते मिळाल्याचे दाखवण्यात आले. परंतु वस्तुस्थिती वेगळी होती. शाळेच्या दुरुस्तीसह नवीन बांधकामासाठीही निधी देण्यात येतो. असे असतानाही शाळांची दुरवस्था आहे.
आधुनिक साहित्य दिल्यावरही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत नसल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले आहे. एकप्रकारे निधीचा अपव्यय होत असल्याचे मत केंद्र सरकारचे आहे. त्यामुळे त्यांनी शाळांचे सामाजिक अंकेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. अंकेक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना येणार्या अडचणी, त्रास याची माहिती घेण्यात येणार आहे. यात आणखी काही सुधारणा हव्या का, याबाबत अहवालही केंद्राला देण्यात येईल.
या मुद्द्यांवर तपासणी
विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश, पुस्तके मिळालेत का, सर्व पुस्तके मिळाली की, काही कमी मिळाली, गणवेशचा दर्जा कसा आहे, शिक्षक कशाप्रकारे शिकवतात, आधुनिक साधनसाहित्य आहे का ? आदी मुद्द्यांची तपासणी होणार असल्याचे सांगण्यात येते. सामाजिक अंकेक्षणाचे काम पूर्ण झाल्यावर तालुकास्तरावर जनसुनावणीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि संगमनेर तालुक्यातील शाळांची सामाजिक तपासणी केलेल्या पथकातील अधिकार्यांकडून देण्यात आली.




