नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज (रविवारी) नवव्यांदा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) संसदेत सादर करणार आहेत. आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही वेळापूर्वीच राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. यानंतर आता थोड्याच वेळात सीतारामन संसदेत मांडणार आहेत.
आज सादर होणार्या केंद्रीय अर्थसंकल्पात व्यापारी समुदायापासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांमध्ये मोठा उत्साह आहे. समाजातील कमकुवत आणि वंचित घटकांना सक्षम बनवण्याची आशा व्यक्त केली जात असतानाच, महागाई, कर सुलभीकरण आणि व्यवसायात दिलासा यासारखे मुद्देही ठळकपणे समोर येत आहेत. अर्थसंकल्पाबाबत सामान्य जनतेनेही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अन्न धान्याच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी आणि महागाई कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा थेट फायदा निम्न आणि मध्यम वर्गाला होईल, असेही सांगितले जात आहे.
आयकर सवलत १४ लाखांपर्यंत?
यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य करदात्यांचे लक्ष आयकर सवलतींकडे आहे. मागील वर्षी सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर करमाफी दिली होती. तसेच, पगारदार कर्मचाऱ्यांना ७५ हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन देण्यात आली होती. आता करदात्यांची मागणी आहे की, ही करमाफी १२ लाखांवरून १४ लाखांपर्यंत वाढवावी.
यंदा मोठ्या कपातीची शक्यता नाही
गेल्या वर्षी मोठ्या सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदा फक्त स्थिरता आणि सुलभता यावर भर असण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती आणि जागतिक व्यापारातील आव्हाने (जसे अमेरिकेचे शुल्क) लक्षात घेता, कर कपात मर्यादित राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अर्थसंकल्पाआधी एलपीजी सिलिंडर महागला
सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी (आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल) या एलपीजी सिलिंडरच्या किमती ४९ रुपयांनी वाढवला असून, नवीन एलपीजी सिलिंडरचा दर आज ०१ फेब्रुवारीपासूनच लागू झाला आहे. एका महिन्यापूर्वी, जानेवारीमध्येही व्यावसायिक सिलिंडरचा दर १११ रुपयांनी वाढला होता, पण १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.





