लोणी |वार्ताहर| Loni
केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी सहकार पंढरी सज्ज झाली असून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा परिवाराने जय्यत तयारी केली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ आणि लोणी बुद्रूक गावातील ग्रामस्थांनी उभारलेल्या पद्म स्मृती या स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी लोणी गावही भगवेमय झाले आहे.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह दुसर्यांदा लोणीमध्ये येत असून यापूर्वी सहकार परिषदेच्या निमित्ताने त्यांचे सहकार पंढरीत आगमन झाले होते. मंत्री विखे पाटील यांनी बाजारतळावर उभारलेल्या भव्य सभा मंडपाची पाहणी करून, तयारीचा आढावा घेतला. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना तसेच पद्म स्मृतीस्थळ आणि सभास्थळाचे भव्य नियोजन करण्यात आले आहे. आज रविवारी सकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर येणार आहेत. कारखान्याच्या नूतन प्रकल्पाचा शुभारंभ करून ते लोणी बुद्रूक गावामध्ये येतील. बसस्थानकाजवळील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून समोरच उभारलेल्या सभास्थळी पोहोचतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्य मंत्री पंकज भोयर, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. मोनिकाताई राजळे, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, आ. किरण लहामटे, आ. काशिनाथ दाते, आ. विक्रम पाचपुते, आ. विठ्ठलराव लंघे, आ. अमोल खताळ, साखर संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, प्रधान सचिव प्रवीण दराडे, साखर आयुक्त दिपक तावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.




