मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली गेली. मात्र या योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत.
काहीजण या योजनेविरोधात कोर्टातही गेलेत. महायुतीची ही योजना महिला मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार असल्याचं विरोधक सांगतात. आता या योजनेवरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे.
नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित उद्योगांसंदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना गुंतवणुकदारांना एक सल्ला दिला आहे. ‘गुंतवणुकदारांनी सरकारच्या भरोशावर राहू नये, अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात’, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
हे हि वाचा : ‘लाडकी बहीण’ योजनेचे मनपाकडून ६ हजार अर्ज रद्द
नितीन गडकरी कार्यक्रमात बोलताना म्हणाले, माझं तर म्हणणं आहे की कोणत्याही पक्षाचं सरकार असूद्या. गुंतवणूकदारांनी सरकारला बाजूला ठेवलं पाहिजे. सरकार हे विषकन्या असते. ज्यांच्या बरोबर जाते त्यांना बुडवते. तुम्ही त्यांच्या भरोशावर राहू नका. तुम्हाला अनुदान घ्यायचं आहे घ्या. मात्र, अनुदान कधी मिळेल, कधी नाही याचा काहीही भरोसा नसतो.
तसेच, एका जणाने सांगितलं की साडेचारशे कोटी अनुदान आले आहे. टॅक्सचे पैसे जमा आहेत. पुढे त्यांनी विचारलं की पण ते पैसे कधी मिळतील? मी त्यांना म्हटलं परमेश्वराला प्रार्थना करा. कारण काही भरोसा नाही. मग मिळणार का? जेव्हा येईल तेव्हा मिळू शकतात. अनुदानाचे पैसे मिळतील का? याची शाश्वती नाही. कारण लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.
हे हि वाचा : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
दरम्यान नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानाने सरकारचीच कोंडी झाली आहे. राज्य सरकार पैशांचा अपव्यय करतंय, केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. गडकरींच्या या विधानावर संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी नसून उद्याच्या निवडणुकीत शिंदे गटाला मत मिळवण्याची योजना आहे, मते विकत घेण्याची योजना आहे.
लाडक्या बहिणीवर फार प्रेम उफाळून आले असे नाही. त्यासाठी इतर सर्व योजनांचे, प्रकल्पांचे पैसे या फक्त एका लाडकी बहीण योजनेकडे वळवले आहेत. या योजनेवरून सत्तेतल्या तिन्ही गटात मारामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या लाडक्या बहिणीचा डेटा घेऊन त्यांना पत्र पाठवलं, त्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे. गडकरी म्हणतायेत ते बरोबर आहे असं त्यांनी सांगितले.
हे हि वाचा : विधानसभेपूर्वी उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; गावितांची पक्षाला सोडचिठ्ठी, ‘तुतारी’ फुंकणार?