नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती भवनाने मंगळवारी सकाळी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कमल ७६(२) अंतर्गत मंत्र्याचा राजीनामा मंजूर केला आहे. २०२४ मध्ये भाजपच्या ख्रिश्चन समुदायापर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात ऑगस्ट २०२४ मध्ये जॉर्ज कुरियन यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालय यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ संपला होता. भाजपने त्यांना पुन्हा न निवडण्याचा निर्णय घेतला आहे. ६५ वर्षीय जॉर्ज कुरियन हे ऑगस्ट २०२४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. ते भाजपचे एक प्रमुख नेते असून १९८० मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सदस्य आहेत.
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ७५(२) नुसार पंतप्रधानांच्या शिफारशीवरून जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. या मंजुरीनंतर कुरियन आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा भाग राहिलेले नाहीत. मात्र, या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
कोण आहे जॉर्ज कुरीयन?
जॉर्ज कुरियन हे फक्त राजकारणी नसून भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणूनही काम केले आहे. जॉर्ज कुरियन यांचा जन्म २० सप्टेंबर १९६० रोजी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील एट्टुमानूर नगरपालिकेच्या नंबियाकुलम येथे झाला. त्यांनी गावी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायद्यामध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. कुरियन यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही.९ जून २०२४ रोजी जॉर्ज कुरियन यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ११ जून २०२४ रोजी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. याआधी जॉर्ज कुरियन यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष आणि तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री ओ. राजगोपाल यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून काम पाहिले होते.




