मुंबई | Mumbai
गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर मराठवाडा विभागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेला इशारा अखेर खरा ठरला असून मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार एन्ट्री झाली आहे. मंगळवार सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर वाढत असून मुंबईला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्यात मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश भागात जोरदार पाऊस बरसत आहे.
मुंबई, आणि आसपासच्या उपनगरांमध्ये, जवळच्या जिल्ह्यांत सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती असून २४ ते २७ जून दरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अंतर्गत भागातील काही प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नागरिकांची उष्णतेपासून सुटका
राज्यात मान्सूनचा प्रवास लांबल्यामुळे उष्णतेत वाढ झाली होती. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जून महिन्यातही कमाल आणि किमान तापमानात वाढ झालेली दिसत होती. त्यामुळे नागरिक उष्णतेमुळे हैराण झाले होते. शिवाय पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. अखेर काल सोमवार पासून राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रीय झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुन्नरमध्ये आभाळ फाटलं
राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती असून 24 ते 27 जूनच्या दरम्यान कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. तशी परिस्थिती असल्यामुळे राज्यातील जनता त्यातही शेतकरी सुखावला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात कुमशेत भागात ढगफुटीसदृष्य पाऊस कोसळला. या धुवांधार पावसामुळे रस्ते, ओढे आणि नाले भरून वाहू लागले आहे. जणू पूर आल्यासारखी स्थिती आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वैजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस
वैजापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे गळमोडी नदीला पूर आला. छोटा पूल नदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याचे दिसले. जालना शहरासह परिसरातही आज दमदार पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असताना पावसाने हजेरी लावल्यामुळे सारेच सुखावले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




