Monday, May 27, 2024
Homeक्रीडासर्वांगीण आरोग्यासाठी खेळांचे अनन्यसाधारण महत्व : डॉ.गावित

सर्वांगीण आरोग्यासाठी खेळांचे अनन्यसाधारण महत्व : डॉ.गावित

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सर्वांगीण आरोग्यासाठी खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.तसेच विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबत आदिवासी संस्कृतीचेही जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit)यांनी केले.

- Advertisement -

आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. गावित बोलत होते.या कार्यक्रमासाठी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, नाशिक जात पडताळणी समितीचे सहआयुक्त विनोद पाटील, उपायुक्त अविनाश चव्हाण, सुदर्शन नगरे, हितेश विसपुते, सहायक आयुक्त हेमलता गव्हाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व राज्यातील एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गावित म्हणाले की, जीवनात चांगला खेळाडू होण्यासाठी शिस्त, कौशल्य, चांगल्या सवयी, शारीरिक क्षमता, मानसिक आरोग्य या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे गरजेचे आहे.आश्रम शाळेंच्या आवारात क्रीडांगण तयार करावेत. तसेच संस्कृतीचे महत्व सांगतांना त्यात पारंपरिक वाद्य, नृत्य, भाषा यांचे शिक्षण आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात यावे, जेणेकरून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संस्कृतीची जपणूक होण्यास मदत होईल.

आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे म्हणाले, आदिवासी विद्यार्थी हे जिद्दी, साहसी व चिकाटीचे असतात. या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता आदिवासी विकास विभाग सातत्याने कार्यरत आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देवून त्यांना विविध क्षेत्रात प्रगतीसाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आदिवासी विभाग प्रयत्न करत आहे.

आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्य व कलागुणांना उभारी देण्याचे काम आदिवासी विभाग करत आहे. राज्यातील एक हजार 746 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. या सर्व खेळाडूंना क्रीडा स्पर्धेसाठी शपथ देण्यात आली. त्यानंतर बंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचे डॉ. गावित यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या