Friday, May 3, 2024
HomeUncategorizedअद्वितीय मॅरेडोना

अद्वितीय मॅरेडोना

– नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

क्रिकेट हा जगभरातील बहुलोकप्रिय क्रीडाप्रकार मानला जात असला तरी सर्वाधिक लोकप्रियता लाभलेला खेळ म्हणून फुटबॉलचा उल्लेख केला जातो. फिफा वर्ल्डकप ही क्रीडाजगातील सर्वांत लोकप्रिय आणि सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणारी स्पर्धा आहे. अशा या सर्वोच्च लोकप्रिय खेळाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळख पावलेल्या दिएगो मॅराडोनाचे नुकतेच निधन झाले.

- Advertisement -

या वृत्ताने जगभरातील त्याचे शब्दशः कोट्यवधी चाहते प्रचंड हळहळले. अर्जेंटिनाच्या या महान फुटबॉलपटूचा मैदानावरील थरार ज्यांनी पाहिला आहे त्यांना मॅराडोना नावाच्या वादळाची कल्पना आहे. कुरळ्या केसांचा आणि जाड भुवयांचा, भारदस्त मांड्या असलेला मॅराडोना फुटबॉलच्या सामन्यात मैदानावर ज्या वायूवेगाने बॉल घेऊन जाऊन गोल करायचा ते पाहताना डोळ्यांचे पारणे फिटायचे.

मॅराडोनाच्या निधनानंतर ‘हँड ऑफ गॉड’ ची नव्याने चर्चा झाली. याबाबतचा किस्सा मोठा रंजक आहे. 1986 च्या वर्ल्डकपमधील हा प्रसंग. मॅराडोनाचा संघ तेव्हा इंग्लंडविरुद्ध क्वार्टर फायनल खेळत होता. मॅराडोनाने या सामन्यात दोन गोल केले. त्यातील एका गोलला ‘हँड ऑफ गॉड’ म्हटले जाते. याचे कारण हा गोल झाला तेव्हा इंग्लंडच्या संघाने बॉल मॅराडोनाच्या हाताला लागून गेला असा दावा केला होता; परंतु पंचांनी तो फेटाळून लावत गोल झाल्याचा निकाल दिला. यामुळे इंग्लंड या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आणि अर्जेंटिना सेमीफायनला पोहोचला. पुढे जाऊन हा चषकही त्यांनी पटकावला. सामन्यानंतर मॅराडोनाने ‘ हा गोल माझ्या डोक्याला आणि काहीसा देवाच्या हस्तस्पर्शाने झाला, असे मत व्यक्त केले. त्यामुळे फुटबॉलच्या इतिहासात हँड ऑफ गॉड म्हणून या गोलची आणि मॅराडोनाची नोंद झाली. या गोलला ‘गोल ऑफ द सेंच्युरी’ असेही म्हटले जाते. या विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मॅराडोनाला सन्मानित करण्यात आले. त्यांनी गोल्डन बॉलही पटकावला.

मॅराडोना हे क्युबाचे सर्वोच्च नेते राहिलेल्या फिडेल कॅस्ट्रो यांचे मनस्वी चाहते होते. किंबहुना, कॅस्ट्रोंना ते वडिलांसमान मानत असत. योगायोग म्हणजे कॅस्ट्रो यांचे निधन 25 नोव्हेंबर 2016 रोजी झाले आणि 2020 च्या 25 नोव्हेंबर रोजी मॅराडोनाने जगाचा निरोप घेतला.

फुटबॉलच्या खेळामध्ये मोठा शॉट मारण्याला फारसे महत्त्व नाही. इथे महान खेळाडू तोच ठरतो जो ड्रिबलिंगमध्ये तरबेज असतो. अशाच खेळाडूंना चाहत्यांचीही पसंती मिळते. यादृष्टीने पाहता फुटबॉलच्या इतिहासात पेले आणि मॅराडोना हे सर्वश्रेष्ठ राहिले. पेले फुटबॉलच्या सामन्यामध्ये दोन्ही पायांचा वापर उत्कृष्टरित्या करत असत. त्यांचा हेड शॉटही उत्तम असायचा. 1970 च्या इटलीविरुद्धच्या अंतिम फेरीतील सामन्यात पेलेंनी मारलेला हेडर आजही रसिकांच्या स्मरणात आहे. या गोलची पोस्टर्स तेव्हाही प्रचंड गाजली होती आणि आजही काही ठिकाणी ती पाहायला मिळतात. पेलेंच्या तुलनेत मॅराडोना यांचा हेडर सामान्य स्वरुपाचा होता. मात्र त्यांना महान बनवले ते त्यांच्या डाव्या पायाने ! मॅराडोनांच्या डाव्या पायात जर फुटबॉल आला तर तो रोखणे अशक्य असायचे. चेंडूवरील त्यांचे नियंत्रण आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला चकवा देण्याची कला अद्वितीय होती. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे गोलसंरक्षण कवच कितीही अभेद्य असले तरी एखाद्या शूर सेनानीप्रमाणे मॅराडोना गोल करत असत. कोणत्या क्षणी ते आपली पोझिशन बदलतील याचा जराही अदमास विरोधी संघाला यायचा नाही. ड्रिबलिंगचा विचार करता मॅराडोना हे पेलेंपेक्षा कंकणभर का होईना पण सरस होते हे निर्विवाद ! मॅराडोनांचा फ्री किकही पेलेंपेक्षा सरस होता.

मॅराडोंनाच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्यांचा खेळ अधिक बहरुन यायचा. इतका की संपूर्ण सामन्यावर त्यांचीच जादू असायची. सहज विजय मिळण्याची शक्यता असणार्‍या सामन्यात ते फार चमकायचे नाहीत; पण संघ जेव्हा अडचणीत सापडल्याचे दिसून येई तेव्हा मात्र त्यांचा परफॉर्मन्स लाजवाब असायचा. मॅराडोनांनी आपल्या कारकिर्दीत 491 सामन्यांमध्ये एकूण 259 गोल केले. यामध्ये विश्वचषक स्पर्धांमधील 91 सामन्यांत 34 गोलचाही समावेश आहे. फुटबॉल हा मॅराडोनांचा श्वास होता. अर्जेंटिनाच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठीची मैदानावरची त्यांची तडफड आणि झपाटा हा विलक्षण असायचा. एका विश्वचषक सामन्यात अर्जेंटिनाचा संघ पराभूत झाल्यानंतर मॅराडोना ज्याप्रकारे रडले होते ते त्यांच्यातील फुटबॉलप्रेमाचं दर्शन घडवणारे विदारक चित्र होते.

फुटबॉलविश्वावर चिरंतन काळ आपला ठसा उमटवण्यात मॅराडोना यांना यश आले असले तरी त्यांचा जीवनप्रवास संघर्षमय आणि वादांनी भरलेला राहिला. ब्युनस आयर्स या झोपडपट्टीबहुल भागात अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मॅराडोना तीन वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना एक फुटबॉल भेट म्हणून दिला होता. तेव्हापासून त्यांचा फुटबॉलवर इतका जीव जडला की सहा महिन्यांपर्यंत तो बॉल आपल्या शर्टमध्ये घेऊन ते झोपत असत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने ते एका केमिकल कंपनीत नोकरी करत होते.

वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलविश्वात पाऊल ठेवले आणि अवघ्या जगाला आपल्या अफलातून खेळाने अक्षरशः वेड लावले. 1982 मध्ये स्पेनमधील बार्सिलोना या ख्यातनाम क्लबने अर्जेंटिनाच्या या स्टार खेळाडूसोबत 30 कोटींचा करार केला. फुटबॉल जगतात या कराराने प्रचंड खळबळ उडाली होती. एखाद्या खेळाडूला इतकी प्रचंड रक्कम मिळू शकते यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. 1982 च्या वर्ल्डकपमध्ये दोन गोल करणार्‍या मॅराडोनांनी 1980 ते 1990 अशा दहा वर्षांच्या कालखंडात फुटबॉलविश्वावर आपला दबदबा कायम ठेवला होता. 1984 मध्ये नेपोली या इटलीली क्लबने त्यांच्याशी करार केला तेव्हा त्याबदल्यात त्यांना 50 कोटी रुपये दिले गेले. अशा प्रकारे ते जगातील सर्वांत महागडे खेळाडू ठरले होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणानंतर त्यांना ‘विसाव्या शतकातील महान फुटबॉलपटू’ म्हणून गौरवण्यात आले होते. तथापि, नंतरच्या काळात फिफाने मतदानाचे नियम बदलले; परिणामी 2011 मध्ये पेले आणि मॅराडोना या दोघांना हा खिताब देण्यात आला.

मॅराडोनांच्या चाहत्यांची संख्या इतकी प्रचंड आहे आणि त्यांचे या फुटबॉलच्या महानायकावर प्रेमही किती विलक्षण आहे याची कल्पना ‘चर्च ऑफ मॅराडोना’वरुन येते. 30 ऑक्टोबर 1998 रोजी मॅराडोनाच्या 38 व्या वाढदिनी अर्जेंटिनातील रोजारियो या शहरात या चर्चची स्थापना करण्यात आली. 2008 आणि 2017 मध्ये मॅराडोना भारतात आले होते. ते पहिल्यांदा कोलकात्यात आले तेव्हा मध्यरात्री त्यांना पाहण्यासाठी विमानतळाबाहेर हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. केरळमधील एका ज्वेलरी कंपनीने त्यांना ब्रँड अ‍ॅम्बेसिडरही बनवले होते.

मॅराडोनांची तुलना नेहमीच फुटबॉलचा महान खेळाडू पेलेंशी केली जाते. तथापि मैदानाबाहेरील कारकिर्द किंवा व्यक्तिमत्त्व म्हणून मॅराडोनांपेक्षा पेले नेहमीच सरस राहिले. मैदानावरील निवृत्तीनंतर पेले सामाजिक कार्यात सहभागी झाले. ब्राझीलमध्ये भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष करत राहिले. गरीबीविरोधातही त्यांनी लढा दिला. 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात त्यांना राजदूत म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. याउलट मॅराडोना यांचे व्यक्तिमत्त्व विक्षिप्त होते. तसेच अमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्यांची कुप्रसिद्धीही बरीच झाली. असे असूनही फुटबॉल खेळातील त्यांचे कर्तृत्त्व आणि जादू यांविषयीचा लोकमनातील, चाहत्यांतील आदर चिरकाळ कायम राहणारा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या