Saturday, November 23, 2024
Homeक्राईमNashik Crime News : व्यापाऱ्याचे अपहरण करुन लुटले; चौघे फरार

Nashik Crime News : व्यापाऱ्याचे अपहरण करुन लुटले; चौघे फरार

सीसीटीव्ही फूटेजनुसार तपास सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एका किराणा दुकानदारास रस्त्यात अडवत चार अपहरणकर्त्यांनी त्याच्या डोक्यात पाईपने प्रहार करत बेशुद्ध करुन कारमधून अपहरण (Kidnapping) केल्याची धक्कादायक घटना म्हसरुळ पोलिसांच्या (Mhasrul Police) हद्दीतील केंब्रिज स्कूलजवळ बुधवारी (दि. ५) रात्री घडली. या घटनेत चौघा अनोळखी संशयितांनी व्यापाऱ्यास कारमधून अपहरण केल्यावर मारहाण (Beating) करीत त्याच्या अंगावरील दागिने, खिश्यातील पैसे ओरबाडल्यावर व्यापाऱ्यास निर्जनस्थळी सोडून देत पळ काढला. याबाबत म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक विश्लेषणाद्वारे अपहरणकर्त्यांचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, वणी येथील बाजारपेठ गल्लीतील किराणा व्यावसासिक अमित रविंद्र कुलकर्णी (वय ३६) हे बुधवारी सायंकाळी पाच वाजेनंतर वणी येथून नाशिककडे येण्यासाठी दुचाकीवरुन निघाले. सायंकाळी साडेसात वाजता ते दिंडोरी रोडवरील केंब्रिज स्कूलजवळून पंचवटीकडे मार्गस्थ होत असताना, एका कारमधून चार अनोळखी संशयित आले. त्यांनी चेहऱ्याला रुमाल बांधून कुलकर्णी यांना कुरापत काढून अडविले. यानंतर त्यांना काही कळण्याच्या आत चौघांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावर पाईपने प्रहार करुन जखमी (Injured) केले. जोरदार प्रहार झाल्याने ते बेशुद्ध झाले.

त्यानंतर चौघांनी कुलकर्णी यांची दुचाकी घटनास्थळी सोडून त्यांना बळजबरीने कारमध्ये बसविले. दरम्यान, म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केंब्रिज स्कूल ते वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या लिंक रोडने संशयितांनी कार वेगात चालवून कुलकर्णी यांना पुन्हा मारहाण करुन त्यांच्या अंगावरील दागिने, सोन्याची चेन, खिश्यातील पैसे असा १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. या घटनेनंतर अपरहरणकर्त्यांनी कुलकर्णी यांना याच मार्गावरील निर्जनस्थळी सोडून कारमधून पळ काढला.

फिर्याद देण्यास विलंब!

चौघांनी अपहरण करुन लूटमार केल्याची फिर्याद कुलकर्णी यांनी घटनेच्या तीन दिवसांनंतर म्हणजेच (दि. ८) रोजी नोंदविली आहे. त्यामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून दडपण व भितीच्या सावटाखाली असल्याने त्यांनी उशिरा फिर्याद नोंदविली का याचा तपास सुरु आहे. दरम्यान, हा गुन्हा घडला असून संशयितांची ओळख पटलेली नाही. विविध परिसरातील सीसीटीव्ही फूटेज, कारची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली आहे. या प्रकाराबाबत पोलिसांना विविध प्रश्न व शंका उपस्थित होत असून सर्वच शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या