अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्याच्या विविध भागासह मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांत जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, शनिवार दि. 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व विजा, वारा वावटळीसह अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. बुधवार 21 मे ते शनिवार 31 मे पर्यंतच्या दहा दिवसांत मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. यासह मध्य महाराष्ट्रातील 10 व मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात सोमवार 19 मे पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार 25 मेपर्यत जोरदार तर विदर्भातील 11 जिल्ह्यात यादरम्यान मध्यम पावसाची शक्यता.
विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, खान्देश, नाशिक,अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड या 17 जिल्ह्यात चालू आठवड्यात वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे. या पावसामुळे केवळ पेरणपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा, असे वाटते. कपाशी व टोमॅटो लागवडी करु इच्छिणार्या शेतकर्यांनी पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, अन्यथा लागवडीवर विपरीत परिणामही होवू शकतो. राज्यात अद्याप मान्सून टप्प्यात आलेला नाही. त्याच्या सरासरी तारखेचा विचार केल्यास, महाराष्ट्रात येण्यास अजून 25 दिवसांचा कालावधी आहे आणि त्याच्या आगमनानंतर त्याची स्थिती काय असेल, याबाबत आताच भाष्य करणे घाईचे ठरेल, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी कळवले आहे.
यामुळे यंदा अवकाळीच्या धारा
अरबी समुद्र, बंगाल उपसागर, व दक्षिण चीनच्या प्रशांत महासागर अशा तीन समुद्रात 17 ते 20 डिग्री उत्तर अक्षवृत्तदरम्यान, तिन्हीही ठिकाणी तयार होणारे कमी दाब क्षेत्रे व त्यातून तयार होणारी चक्रीय वार्यांची स्थिती आणि ह्या तीनही ठिकाणी त्यांचे उत्तरेकडे होणार्या मार्गक्रमणामुळे वळवाच्या गडगडाटी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात गुजराथ व महाराष्ट्र किनारपट्टीसमोर तर बंगाल उपसागरात पश्चिम बंगाल व ओरिसा किनारपट्टी समोर तर प्रशांत महासागरात चीनच्या गूएन्गडॉन्ग राज्याच्या माकू शहराजवळील किनारपट्टी समोर या चक्रीय वार्यांच्या स्थिती तयार होणार आहेत. तसेच अरबी समुद्रातील गुजराथकडे तर बं. उपसागरातील ओरिसा छत्तीसगडकडे चक्रीय वार्यांचे मार्गक्रमण होणार आहे. म्हणून महाराष्ट्र व गुजराथ, ओरिसा, बंगाल येथे अवकाळी पावसाची शक्यता आहे.