अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सोमवारी वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे 9 तालुक्यातील 52 गावांमधील 423 हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा फटका 946 शेतकर्यांना बसला आहे. सर्वाधिक तडाखा अकोले व संगमनेर या दोन तालुक्यांना पावसाचा बसला आहे. या पावसात प्रामुखाने कांदा, आंबा, डाळिंब, केळी, बाजरी, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अर्थात कृषी विभागाने नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात सोमवारी वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अहिल्यानगर, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नेवासा, शेवगाव, संगमनेर, अकोले या नऊ तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यात 52 गावे बाधित झाली आहेत. अकोले व संगमनेर तालुक्यात या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अहो. अकोले तालुक्यात 18 गावांमधील 153.75 हेक्टर क्षेत्रातील बाजरी, डाळींब व भाजीपालाचे नुकसान झाले असून 428 शेतकर्यांना त्यांचा फटका बसला आहे. तर संगमनेर तालुक्यात 12 गावांमधील 123 हेक्टर क्षेत्रातील बाजरी, कांदा, टोमॅटो, लिंबू, झेंडू व निमोणी या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात 303 शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
अन्य तालुक्यातील नुकसान पुढीलप्रमाणे आहे. अहिल्यानगर 2 गावे 1 हेक्टर क्षेत्र व 2 शेतकरी, पाथर्डी 9 गावे 60.9 हेक्टर क्षेत्र तर 88 शेतकरी, कर्जत 3 गावे, 50.30 हेक्टर क्षेत्र तर 62 शेतकरी, श्रीगोंदा 3 गावे, 13 हेक्टर क्षेत्र तर 35 शेतकरी, जामखेड 1 गावे, 10 हेक्टर क्षेत्र तर 12 शेतकरी, नेवासा 2 गावे, 7.80 हेक्टर क्षेत्र व 12 शेतकरी, शेवगाव 2 गावे, 3.20 हेक्टर क्षेत्र तर 4 शेतकरी संख्या आहे. या पावसात 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानमध्ये 356.27 हेक्टर क्षेत्र असून 789 शेतकर्यांचा नुकसान झाले आहे. तर 33 टक्क्यापेक्षा कमी नुकसानीत 66.80 हेक्टर क्षेत्र असून 157 शेतकर्यांचा समावेश आहे.