अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे नगर जिल्ह्यातील शेतीपिकांसह आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने 16 हजार 177 शेतकर्यांना नुकसानीपोटी 16 कोटी 68 लाख रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. यंदा उन्हाळ्यात एप्रिल महिन्यांत आधी पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले. त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार अवकाळी जोरदार सुरुवात झाली. यात उन्हाळ्याच्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळतांनाच दुसर्या बाजूला शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मे महिन्यांत झालेल्या पावसाने जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील 744 गावातील शेतकर्यांना 6 हजार 521.37 हेक्टरवर अधिक फटका बसला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पाणी साठलेले होते. परिणामी, अनेक ठिकाणच्या शेतकर्यांना खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करता आली नाही, तसेच बागायती आणि फळबाग असलेल्या शेतामध्ये अनेक दिवस पाणी साठून राहिल्याने झाडांना बाधा पोहोचली. अवकाळी पाऊस झाल्यानंतर महसूलसह कृषी कर्मचार्यांनी बांधावर जाऊन पीक पंचनामे केले. बहुतांश ठिकाणीचे वाफसे झाले नसल्यामुळे पंचनामे करण्यास विलंब झाला. संपूर्ण ठिकाणचे अचूक पंचनामा रिपोर्ट आल्यानंतर त्याचा अहवाल शासनास पाठविण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे 16 हजार 177 शेतकर्यांच्या नुकसानीपोटी 16 कोटी 68 लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यात 1 हजार 193.19 हेक्टरवरील फळपिकांचा समावेश असून 4 कोटी 29 लाख रुपये शासनाकडून अपेक्षित रक्कम आहे. शासनाच्या अटीनुसारच शेतकर्यांना आर्थिक मदत दिली जाते. नगर, अकोले, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील बाधित शेतकर्यांची संख्या अधिक आहे.
असा आहे फटका
नगर 2 हजार 263 शेतकरी, 1 हजार 104.34 हेक्टर आणि झालेले नुकसान 3 कोटी 22 लाख. पारनेर 868 शेतकरी, 459.48 हेक्टर आणि झालेले नुकसान 1 कोटी 25 लाख. पाथर्डी 243 शेतकरी, 106.90 हेक्टर आणि झालेलले नुकसान 34 लाख. कर्जत 1 हजार 802 शेतकरी, 776.96 हेक्टर आणि झालेले नुकसान 2 कोटी 18 लाख. जामखेड 718 शेतकरी 276.04 हेक्टर आणि नुकसान 76 लाख. श्रीगोंदा 1 हजार 985 शेतकरी, 890.57 हेक्टर आणि नुकसान 2 कोटी 54 लाख. श्रीरामपूर 52 शेतकरी, 39.24 हेक्टर आणि नुकसान 10 लाख. राहुरी 1 शेतकरी 362, 513.48 हेक्टर आणि नुकसान 1 कोटी 41 लाख. नेवासा 532 शेतकरी, 365.59 हेक्टर आणि नुकसान 1 कोटी 2 लाख. शेवगाव 46 शेतकरी, 20 हेक्टर आणि नुकसान 5 लाख. संगमनेर 968 शेतकरी, 523.66 हेक्टर आणि नुकसान 1 कोटी 75 लाख. अकोले 5 हजार 168 शेतकरी, 1 हजार 336.43 हेक्टर आणि नुकसान 3 कोटी 68 लाख. कोपरगाव 74 शेतकरी 34.46 हेक्टर आणि नुकसान 9 लाख. राहाता 96 शेतकरी, 74.29 हेक्टर आणि नुकसान 23 लाख असे आहे.





