Monday, July 8, 2024
Homeनाशिकसिन्नरसह तालुक्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसला; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

सिन्नरसह तालुक्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसला; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

- Advertisement -

शहरासह तालुक्याच्या अनेक भागात शनिवारी (दि.११) रोजी सायंकाळी ७.३० वाजेनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे (Farmers) मोठे नुकसान (Damage) झाल्याचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे दिसून आले. तर काही भागात शेतकऱ्यांच्या पिकाचे व इतर मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. शहरातही जोरदार पाऊस झाल्याने व्यावसायिक व नागरिकांची चांगली धांदल उडाली.

शुक्रवारी (दि. १०) दुपारनंतर शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे (Rain) शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाठच वाहत होते. तालुक्यातील माळेगाव, सरदवाडी परिसरात गाराही पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यानंतर शनिवारी (दि.११) सकाळपासून कडाक्याचे ऊन दिवसभर होते. त्यामुळे दिवसभर चांगलाच उकाडा जाणवत होता. सायंकाळनंतर शहरासह तालुक्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी साडेसात वाजेनंतर सुरू झालेला पाऊस रात्री १० वाजेपर्यंत सुरु होता.

तालु्क्यातील ठाणगाव, डुबेरे, मनेगाव, जामगाव, विंचूरदळवी, शिवडे तसेच पूर्व भागातील दातली, खोपडीसह अनेक भागात पावसाचा जोर अधिक होता. नांदुरशिंगोटे, दोडी, दापुर परिसरातही पावसाच्या सरी बसरल्या. नायगाव खोऱ्यातही पावसाने शेतकऱ्यांचे नुकनान केले. दातली-माळवाडी रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर आज (दि. १२) सकाळपर्यंत रस्त्यावरील वाहतूक ठप्पच होती. तसेच याच परिसरात वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांबही उन्मळून पडले. त्यामुळे परिसरात रात्रभर विजेचा (Electricity) खोळंबा होता.

तर नायगाव रस्त्यावर वाऱ्यामुळे झाड रस्त्यावर पडल्याने संदीप पानसरे याच्या घराजवळचा रस्ता वाहतूकीस रात्रीपासून बद होता. पावसामुळे विद्युत ताराही तुटल्याने रात्रभर विद्युत प्रवाह ठप्प होता. सध्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांदा साठवून ठेवला असून अचानक सुरू झालेल्या या पावसाने अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याचा अंदाज आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतमालाचे ही नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

पॉलिहाऊसचे लाखोंचे नुकसान

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील मानमोडा फाटा येथे स्वाती विनायक रानडे यांच्या एक एकर पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नवीनच बांधलेल्या या पॉलिहाऊसचे वादळी वाऱ्यामुळे कागद उडून गेल्याने संपूर्ण शेडनेटच उघड्यावर पडले आहे. पॉलिहाऊससाठी त्यांनी लाखोंचा खर्च केला होता. मात्र, पावसामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

रात्रभर विद्युत पुरवठा ठप्प

विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा ठप्प झाला होता. अनेक भागात वीज तारा तुटल्याने अनेक गावे रात्रभर अंधारातच होती. सिन्नर शहरातही रात्री आठ वाजेपासून विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना व व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागला. मध्यरात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता.

- Advertisment -

ताज्या बातम्या