नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेने शनिवारी इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ला केला. इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन प्रमुख अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले केले आहेत. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. शनिवारी रात्री इराणवरील हवाई हल्ल्यांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्याला लगेच फोन केला. त्यांच्याशी झालेली चर्चा खूपच आपलेपणाची आणि भावनिक होती असे नेतन्याहू म्हणाले.
अमेरिकेने इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकन सैन्याने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केला असून सर्व विमान सुरक्षितपणे इराणच्या हद्दीतून बाहेर पडली आणि आपापल्या ठिकाणी पोहचल्याचे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आहे. अमेरिकेने ताकदीने काम केले आहे आणि शांतता प्रस्थापित करण्याचा हाच खरा मार्ग आहे, असे बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला नेतन्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अभिनंदन करताना, इराणच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करण्याचा ट्रम्प यांनी घेतलेला धाडसी निर्णय इतिहास बदलेल, असे म्हटले आहे. ट्रम्प हे स्वातंत्र्यावर विश्वास असलेले जगातील एक मजबूत नेते असून ते इस्रायलचे सर्वात महत्त्वाचे मित्र आहेत आणि त्यांच्यापेक्षा मोठा कोणीही नाही. त्यांनी आपल्याबरोबरच, इस्रायलची जनता तसेच ज्यू समुदायातर्फे ट्रम्प यांचे मनापासून आभार मानले आहेत.
“अमेरिका खरोखरच अद्वितीय आहे. त्यांनी असे काही केले आहे जे पृथ्वीवरील इतर कोणताही देश करू शकत नाही. इतिहासात नोंद आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक राजवट, जगातील सर्वात धोकादायक शस्त्रे संपवण्याचे काम केले,” असे नेतन्याहू यांनी व्हिडीओमध्ये म्हटले.
शांतता शक्तीतून येते
“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मी नेहमी म्हणतो की,’शांतता शक्तीतून येते. आधी ताकद दाखवली जाते, नंतर शांतता येते,’ आज रात्री, ट्रम्प आणि अमेरिकेने पूर्ण ताकदीने त्यांचे काम केले आहे,” असे म्हणत नेतन्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे लष्करी कारवाईबद्दल अभिनंदन केले आणि त्यांचे आभार मानले.
हा हल्ला इस्रायली आणि अमेरिकन सैन्याच्या समन्वयाने करण्यात आला. यासोबतच इराणच्या आण्विकस्थळांना नष्ट करण्याचे आपले वचन पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या युद्धाच्या सुरुवातीलाच मी वचन दिले होते की, कसेही करून इराणच्या आणू प्रकल्पांना नष्ट केले जाईल. आता हे वचन पूर्ण झाले आहे. नेतन्याहू यांचा हा व्हिडिओ संदेश सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




