नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या डेडलाइनच्या आधीच इराणवर जबरदस्त प्रहार केला आहे. इराणवर मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत डेडलाईन दिली असली तरी अमेरिकेने इराणवर जोरदार प्रहार केला आहे. इराणमधील प्रमुख कच्चा तेलाचे साठे असलेल्या खार्ग बेटावर अमेरिकेने भीषण हल्ला केल्याचे समजत आहे. इराणच्या Mehr News Agency या वृत्तसंस्थेने दिली आहे. या बेटावरून देशाच्या बहुतांश तेल निर्यातीचे व्यवस्थापन केले जाते. Spectator Index या न्यूज प्लॅटफॉर्मने X वर दिलेल्या माहितीनुसार हे हल्ले अमेरिकेने केल्याचा दावा करण्यात आला आहे.
इराणचा महत्त्वपूर्ण तेल डेपो असलेल्या खार्ग बेटावर जोरदार हल्ले सुरू आहेत. हा हल्ला इतका भीषण आहे की संपूर्ण बेटावर स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. खार्ग बेट इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो कारण इराण जवळपास ९० टक्के कच्चे तेल याच बेटावरून निर्यात करते. अमेरिकेच्या या हल्ल्याने जागतिक ऊर्जा बाजारात आणखी खळबळ माजणार आहे.
खार्ग बेटावर हल्ला झाल्यास इराणने दिला होता इशारा
खार्ग बेटावरील या हल्ल्यांची बातमी तेहरानने दिलेल्या इशाऱ्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत समोर आली आहे. इराणने स्पष्ट केले होते की, त्यांच्या दक्षिण किनाऱ्यांवर किंवा बेटांवर कोणताही हल्ला झाल्यास पर्शियन आखातातील जलमार्गांमध्ये समुद्री माईन्स (बारुदी सापळे) टाकून वाहतूक विस्कळीत केली जाईल.
खार्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र मानले जाते. या बेटावर ताबा मिळवण्याचे संकेत आधीपासून डोनाल्ड ट्रम्प देत होते. यातून इराणच्या अर्थव्यवस्थेची नाडी आवळण्याची तयारी अमेरिकेने केली होती. खार्ग बेटावर कब्जा करण्याची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी ४० वर्षांपूर्वीच म्हणजेच १९८८ मध्येच बोलून दाखवली होती. पर्शियन आखातात स्थित खार्ग बेट इराणसाठी महत्त्वाचे आहे. ते देशातील सर्वात मोठे तेल निर्यात टर्मिनल आहे आणि इराणच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग त्यावर अवलंबून आहे.
दरम्यान, खार्ग किंवा इतर तेल साठ्यांवर जर हल्ले झाले तर अमेरिकेसोबत काम करणाऱ्या कंपन्यांच्या तेल साठे आणि प्रकल्पे उद्ध्वस्त करू. इतकंच नाही तर बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करू असा इशारा इराणने दिला होता. त्यामुळे आता अमेरिकेच्या हल्ल्याला इराण काय प्रत्युत्तर देते हे पाहणे गरजेचे आहे.





