अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासोबत उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांनी सज्जता ठेवावी आणि समन्वयाने काम करावे. जिल्ह्यात बिबट्यांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढला असून पिंजरे लावून बिबटे सापडत नसल्याने त्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करावा, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या.
मंत्री विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथील पालकमंत्री कार्यालयात रविवारी जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी प्राप्त झालेल्या अर्जावर सबंधित विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिकार्यांची बैठक घेऊन संवेदनशीलतेने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, स्वप्निल काळे, वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. पाण्याची मागणी वाढणार असल्याने नियोजनात कोणत्याही चुका होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सर्व विभागांनी एकत्रितपणे यासाठी काम करावे. रोजचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वॉर रुमला येईल याची खबरदारी घ्यावी. मानवी वस्तीत बिबट्यांच्या वाढत्या संचाराचे मोठे आव्हान असून पिंजरे लावूनही बिबटे सापडत नाही. यासाठी ड्रोनचा अधिक वापर करावा. दुपारी दोन वाजेपासून पालकमंत्र्यांनी नागरिकांच्या भेटी घेण्यास प्रारंभ केला. प्रत्येक नागरिकाचा अर्ज स्वीकारून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. व्यक्तिगत संवादातून त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे यशस्वीपणे निराकरण केले.
अहिल्यानगर महानगरपालिका, परिवहन, भूमी अभिलेख, जलसंपदा, महावितरण या विभागाच्या संदर्भातील अर्ज जनता दरबारात प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या सर्व अर्जावर गांभीर्याने कार्यवाही करून पालकमंत्री कार्यालयास आणि संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही पालकंमंत्र्यांनी यावेळी दिल्या.