मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु केलेय. आज सकाळी मोठे शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली. मनोज जरांगेंसह लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आता डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचे नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जरांगे पाटलांनी सरकारने सहकार्य केल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. तसेच आपण चर्चेसाठी तयार असल्याचेही जरांगेंनी म्हटले आहे. मनोज जरांगेंसोबत जवळपास साडेसहा हजार गाड्या मुंबईत दाखल झाल्यात. सरकारने गोळ्या घातल्या तरी आपण मागे हटणार नाही. मात्र तुम्ही समाजाच्या नावाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करु नका असे आवाहन जरांगेंनी समर्थकांना केले आहे.
दोन तासांत मुंबई रिकामी करा
आझाद मैदानावर ठरवल्याप्रमाणे आलो, उपोषण सुरु केलेय, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली. सरकार सहकार्य करत नव्हते म्हणून मराठे मुंबईत आले. आंदोलनाला आधी परवानगी नव्हती. त्यानंतर सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिली. सरकारने सहकार्य केले, आता आपणही सहकार्य करु, असे मनोज जरांगेंनी सांगितले. कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही. मराठा बांधवांनी गोंधळ घालायचा नाही, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. तसेच मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी झाली आहे. काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी येथे जावे, पुढील २ तासांत मुंबई रिकामी करा…काहीजण वाशीत मुक्काम करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. मुंबईत आंदोलकांची अडचण होऊ नये, पावसाचे दिवसही आहे. त्यामुळे काही आंदोलकांनी मुंबई सोडून मुंबईच्या वेशीवर असलेल्या वाशीत आंदोलन सुरु करावे, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले.
पोलिसांना सहकार्य करा
जरांगेंनी गाड्या घेऊन आलेल्या समर्थकांना पोलिसांना सहकार्य करत पार्किंगसाठी ठरवून दिलेल्या जागी गाड्या लावण्याचे आवाहन केले. जरांगेंनी कोणत्याही पद्धतीची हुल्लडबाजी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे समर्थकांना सांगितले. तसेच शिस्तभंग करणाऱ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही असा इशारच जरांगेंनी आंदोलनाच्या मंचावरुन दिला.
मागण्यांची अंमलबजावणी होई पर्यंत मुंबई सोडणार नाही
मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचे नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. पोलिसांना सहकार्य करा, असे मनोज जरांगेंनी सांगितले. आपण कोणाला बोलायला संधी द्यायची नाही. दारु प्यायची नाही. माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असे वागू नका…याच आझाद मैदानात राहायचे आणि झोपायचे, असे मनोज जरांगे उपस्थित मराठा आंदोलकांना म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





