Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशकात 'या' सात नव्या केंद्रावर होणार लसीकरण

नाशकात ‘या’ सात नव्या केंद्रावर होणार लसीकरण

देवळाली कॅम्प ।

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात करोना संसर्ग आजाराने थैमान घातले आहे. यंदा नववर्षांपासून या आजाराने बाधित होणाऱ्या रुग्णसंख्येत विलक्षण वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बाधित रुग्णसंख्येचा अक्षरश: विस्फोट झाला आहे.

- Advertisement -

याशिवाय मनपाकडून २७ नव्या लसीकरण केंद्राची मागणी केली असता केवळ ७ केंद्रांना मान्यता मिळाल्याने नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण केंद्र व लसींचा पुरवठा वाढविण्यात यावा, अशी मागणी खासदार हेंमत गोडसे यांनी राज्याचे व केंद्राच्या आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

नाशिक जिल्ह्यात कोविड -१९ बाधितांचे प्रमाण अधिकाधिक वाढत चालले आहे. गेल्या महिनाभरात तब्बल ३० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हादरले आहे. नाशिक जिल्हा रुग्णवाढीच्या तुलनेत संपूर्ण देशभरात पाचव्या क्रमांकावर आहे.

आठवडाभरापासून करोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले असून गेल्या तीन दिवसात ७० बाधितांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरपासून दररोज जवळपास ३ हजारांच्या आसपास बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नियमांची पुरेपूर अमंलबजावणी करण्यात येत आहे. मात्र रुग्णवाढीचा वेग वाढतच चालला आहे.

नाशिक शहरात सध्यास्थितीत कोविड लसीकरण केंद्रातून नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. येत्या आठवडात वय वर्षे ४५ वरील नागरिकांना देखील लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आल्याने मोठ्याप्रमाणात लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी पुरेसे लसीकरण केंद्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे नाशिक महानगरपालिकातर्फे २७ लसीकरण केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

यापैकी ७ केंद्रांना संबंधितांकडून मान्यता देण्यात आली असली तरी २० लसीकरण केंद्रांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर उर्वरित २० लसीकरण केंद्रांना देखील मान्यता देण्यात यावी, अशी मागणी खासदार गोडसे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह केंद्राचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

मंजुरी मिळालेले केंद्र

१) अपोलो हॉस्पीटल, २) अशोका हॉस्पीटल, ३) रेडियंन्ट हॉस्पीटल, नाशिकरोड, आणि भामानगर, ४) मोतीवाला होमीओपॅथीक मेडिकल कॉलेज, ५) सी.एन.एस. हॉस्पीटल, मायलन सर्कल, नाशिक, ६) पायनर हॉस्पीटल, अशोका मार्ग, नाशिक, ७) सुयश हॉस्पीटल, तिडके कॉलनी, नाशिक

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक झाला आहे. प्रतिबंधक लसीकरण तळागाळातील नागरिकांपर्यंन्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे पुरेशा कोविड लसींची मागणी तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. लवकरच याला मान्यता मिळेल असा आशावाद आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे.

— खासदार हेमंत गोडसे

- Advertisment -

ताज्या बातम्या