पुणे | Pune
पुण्यातील मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) माजी पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने सासरच्या छळाला कंटाळून (दि.१६ मे) रोजी आत्महत्या केली होती. वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane) मृत्युंनंतर तिचे नऊ महिन्यांचे बाळ आईपासून पोरकं झाले होते. आईच्या मृत्युंनंतर ते बाळ राजेंद्र हगवणे यांच्या परीचयाचे निलेश चव्हाण यांच्याकडे असल्याचा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. अखेर हे बाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी (Father) माध्यमांशी बोलतांना सांगितले की, “एका अज्ञात व्यक्तीचा माझ्या भावाला फोन (Phone) आला होता. त्या व्यक्तीने आमचे बाळ बाणेरच्या हायवेजवळ आमच्याकडे सोपवले आणि ते तिथून निघून गेले. ते कोण होते याची आम्हाला कोणतीही माहिती नाही. आमचे बाळ (Baby) आमच्याकडे आलं याचा आम्हाला आनंद आहे. तसेच, हगवणेंना तात्काळ अटक करा. त्याच्याविरोधात कारवाई करा आणि त्यांना शिक्षा द्या”, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान,उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वैष्णवीचे बाळ तिच्या वडिलांकडे सोपवण्यात यावे असे आदेश दिले होते. यासाठी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली होती. वैष्णवीचे बाळ आधी त्याच्या आत्याकडे होते. यानंतर ते बाळ निलेश चव्हाणकडे देण्यात आले होते. निलेशने ते बाळ अण्णा पवळे आणि अमित पवळे यांच्याकडे दिले होते. अण्णा पवळे हे हगवणेंचे नातेवाईक आहेत. वैष्णवीचे बाळ तीन दिवस पवळे कुटुंबीयांकडे होते. यानंतर आता हे बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांकडे देण्यात आले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा अशा आयोगाने सूचना दिल्या आहेत. जर आरोप खरे असल्याचे आढळून आले तर सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयोगाने महाराष्ट्र पोलिसांकडून तीन दिवसांच्या आत सविस्तर कारवाई अहवाल मागितला होता, तो अहवाल आज पोलिसांकडून (Police) आयोगाला सादर केला जाण्याची शक्यता आहे.