पुणे | Pune
वैष्णवीचा पती शशांक हगवणे याच्याकडे शस्त्र आहे. हगवणे बंधुंकडे तीन शस्त्र आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारावर त्यांनी हे शस्त्रास्त्र परवाने मिळवले. हगवणे बंधुंच्या शस्त्रास्त्रांच्या फाईलवर आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची सही आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. शस्त्रपरवाना देण्याचा निर्णय घेण्यासाठी पाच जणांची समिती असते. ज्यात पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, प्रशासन पोलीस उपायुक्त प्रशासन आणि लायसन्स विभागातील एकचा समावेश असतो. सुपेकर यांनी त्यावेळचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडुन भाच्यांच्या शस्त्रपरवान्याची फाईल मंजुर करुन घेतली आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये परवान्यावर सही केली अशी माहिती समोर आली, त्यावरती आता जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान आता IPS जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधुंना शस्त्रास्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणात आपण जबाबदार नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अमिताभ गुप्ता तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त होते. त्यांच्या परवानगीनंतर आपण फाईलवर सही केली, असे जालिंदर सुपेकरांचे म्हणणे आहे.
जालिंदर सुपेकरांनी स्पष्टीकरण देताना म्हंटले की, शस्त्रपरवान्यासाठी अर्ज स्थानिक पोलीस ठाण्यात केला जातो. पोलीस ठाण्यातून तो पोलीस उपायुक्तांकडे येतो. पोलीस उपायुक्तांकडून तो मंजुरासाठी माझ्याकडे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन या नात्याने माझ्याकडे आला होता. मी तो प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मांडला. त्यांनी त्याला मान्यता दिल्यावर अंतिम सही अतिरिक्त आयुक्त म्हणून मी केली होती. यात महत्वाची भूमिका कोथरुड आणि वारजे पोलीसांची आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता, अशी माहिती जालिंदर सुपेकर यांनी दिली आहे.
शशांक हगवणे याने १७ ऑक्टोबर २०२२ मध्ये शस्त्र परवाना मिळण्यासाठी पुणे पोलीस आयुक्ताकडे अर्ज सादर केला होता. या अर्जामध्ये त्याने फ्लॅट क्रमांक २०३ दुसरा मजला बिल्डिंग क्रमांक ०४ सरगम कॉलनी स.नंबर १५, लेन नंबर ०१, कर्वेनगर हा पत्ता दिला होता. या ठिकाणी १० वर्षांपासून राहत असल्याची खोटी माहिती सादर केली होती. त्यानुसार त्याने शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३० अंतर्गत नियमांचे उल्लंघन करून व आर्म्स रुल २०१६ चे कलम ११ (८) अन्वये शस्त्र परवाना मिळण्याकरता केलेल्या अर्जामध्ये खोटी माहिती सादर केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १७७, १९१,१९२, १९३, ४१७, ४२० यांच्यासह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३० व आर्म्स रुल २०१६ चे कलम ११(८) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा