उंबरे |वार्ताहर| Umbare
राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून काल बुधवारी रात्री तीन ठिकाणी धाडसी चोर्या करून पाच तोळे सोन्याचे दागिणे व अंदाजे एक लाख रुपये रोकड चोरून नेली आहे. यामुळे वांबोरी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहेे.
याबाबत माहिती अशी, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील समर्थनगर परिसरातील शिवाजी बाबूराव खरमाळे, शरद खरमाळे व मुक्ताबाई खरमाळे हे राहत असून बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर आल्या असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटल्याने त्या पुन्हा घरात गेल्या. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा फक्त लोटून घेतला. यावेळी त्यांचा मुलगा शरद त्यांना म्हणाला, आई दरवाजा लावून घे, मुक्ताबाईंना अस्वस्थ वाटू लागल्यानेे त्या दरवाजा न लावताच झोपी गेल्या. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील सामानाची उचकपाचक करून चार तोळे सोन्याचे दागिणे, दहा हजार रुपयांची रोकडवर डल्ला मारला.
त्यानंतर पुढच्या खोलीत झोपलेल्या मुक्ताबाईंच्या कानातील व गळ्यातील दागिणे काढताना स्पर्श झाल्याने त्यांना जाग आली. त्यांनी आरोडाओरड केल्याने पती शिवाजी व मुलगा शरद हे मुक्ताबाई यांच्याकडे धावत आले. यावेळी चोरट्यांनी शरदवर झडप घालून त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. ही घटना मुक्ताबाई यांनी पाहताच त्यांनी शरदला वाचवण्यासाठी चोरट्यांना प्रतिकार केला. या दरम्यान चोरट्यांनी घरातील तिघांना बेदम मारहाण केली. चोरट्यांनी सर्व काळे कपडे घालून तोंडालाही काळा रुमाल बांधला होता. यावेळी चोरट्यांनी घरातील सर्वांना घरात कोंडून बाहेरून कडी लावून पोबारा केला.
दुसर्या घटनेत सुभाषनगर परिसरात राहणार्या विलास गंगाधर कवाणे हे घरात पहिल्या मजल्यावर झोपले असता चोरट्यांनी ते झोपलेल्या खोलीची बाहेरून कडी लावून दुसर्या मजल्यावर गेले. त्या ठिकाणच्या खोलीतील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे एक तोळा दागिणे व पाच हजारांची रोकड चोरून नेली.
सकाळी 6 वाजता कवाणे कुटुंब जागे झाले असता त्यांनी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेरून कडी लावल्याने तो उघडत नव्हता. शेजार्याला फोन करून त्यांना दरवाजा उघडण्यास सांगीतले. परंतू या चोरट्यांनी सर्व शेजार्यांच्याही बाहेरून कड्या लावल्या होत्या. तसेच या परिसरात राहणारे ज्ञानदेव राजाराम गडाख हे नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहत असून त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सामानाची उचकपाचक करून 50 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. गडाख कुटुंब हे 10 ते 15 दिवसांमिळून येथे राहत असतात. पाच दिवसांपुर्वीच ते या ठिकाणी येऊन गेले होते. त्यांना पुणे येथे जात असताना नजर चुकीने 50 हजार रुपये आपल्या घरातील कपाटात राहिल्याने चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला.
वांबोरी परिसरातील वाढत्या चोर्यांमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. या घटनेच्या तपासासाठी श्रीरामपुरचे विभागीय पोलीस अधिक्षक बसवराज शिवपुजे, राहुरीचे पो.नि. संजय ठेंगे, उपनिरिक्षक चारूदत्त खोंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
गेल्या महिन्यात ना. विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या वांबोरी येथील आई-वडील राहत असलेल्या घरी 10 तोेळे सोने व दीड लाख रोख रक्कम चोरीची घटना घडली होती. या घटनेचा अद्यापही तपास लागलेला नसतानाच पुन्हा याच परिसरात पुन्हा तीन ठिकाणी चोर्या झाल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या घटनेचा खरच तपास लागणार का?असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केेला आहे. वांबोरी गावातील चौका-चौकात व गावाबाहेरील असणार्या चौकामध्ये सिसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, अशी मागणी माजी उपसरपंच राजेंद्र पटारे यांनी केली आहे.




