भुसावळ | प्रतिनिधी
हे राष्ट्र सुरुवातीपासून हिंदु आहे मग हिंदू राष्ट्र करण्याची गरजच काय? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा.अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. अॅड.आंबेडकर हे रावेर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या भुसावळ येथील प्रचार सभेत बोलत होते.
अॅड.प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, 2014 पासून तर आजपर्यंत सुमारे 17 लाख भारतीयांनी हा देश सोडून परदेशात कायमस्वरूपी रहिवास केलेला आहे. त्यांनी भारतीय नागरिकत्व का सोडले? हा अभ्यासाचा विषय आहे. पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असणारे पाहिजे मात्र ते सध्या वसुली कार्यालय झाले आहे. ईडी व अन्य चौकशाचा ससे मीरा मागे लावून इलेक्ट्रो बॉण्ड घ्या अन्यथा जेलमध्ये जा असा कारभार सध्या सुरू आहे. या सरकारने देशाला कंगाल केले आहे.
2014 मध्ये शंभर रूपयांमागे 26 रुपये कर्ज होते व मोदींच्या काळात हेच कर्ज 100 रुपये मागे 84 रुपये झाले आहे व जागतिक बँकेच्या नुसार 2026 मध्ये हे कर्ज 100 रुपये मागे 96 रुपये होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे हा देश चालविण्यासाठी देशातीलच संपत्ती उदाहरणार्थ एअरपोर्ट, स्टील कारखाने व अन्य विक्री काढून त्यातून उभा राहणार्या पैशातून हा देश कसाबसा चालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार आर्थिकपणा मजबूत करण्यासाठी आधी त्या दृष्टीने पावले टाकायला हवीत पुढची पाच वर्षे अजून जर आपण या लोकांना सत्ता दिली तर आपल्याला देखील हे गहाण ठेवल्याशिवाय राहणार नाही, असेही प्रतिपादन अॅड.आंबेडकर यांनी केले.
शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व काँग्रेस या पक्षांनी मला सोबत घेतले नाही कारण मी एकटा भारतीय जनता पक्ष व मोदी यांच्यावर सडकून टीका करतो ही मंडळी मात्र सावध भूमिका घेतात म्हणून त्यांनी मला आपल्यापासून लांबच ठेवले आहे. मोदींना मत म्हणजे आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे असल्याचेही श्री आंबेडकरांनी यावेळी सांगितले.उमेदवार संजय ब्राह्मणे यांनीही मनोगत व्यक्त करतांना वंचित बहुजन आघाडीला विजयी करा, असे आवाहन केले. स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर झालेल्या सभेसाठी भर दुपारी मोठी गर्दी होती.