वरणगाव फॅक्टरी/भुसावळ – वार्ताहर/प्रतिनिधी :
12 ऑक्टोबरपासून सुरू होणारा संरक्षण कामगारांचा संप राष्ट्रीयस्तरावर भारत सरकार श्रम व रोजगार मंत्रालयाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाल्यावर स्थगित करण्यात आल्याची माहिती वरणगाव फॅक्टरी कामगार संघटनेकडून मिळाली आहे.
ऑर्डनन्स फॅक्टर्यांचे सरकार खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याने देशभरातील 41 फॅक्टरींमधील कामगार 12 ऑक्टोबरपासून अनिश्चिकालीन संपावर जाणार होते.
परंतु, आज 9 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा झालेल्या सी.एल.सी.मिटिंग सरकार व चार मान्यताप्राप्त संघटनांचे नेते यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याने कामगारांचा होणारा संप स्थगित करण्यात आला आहे.
रक्षा मंत्रालयातर्फे सुरू असलेल्या खासगीकरणाचा प्रस्तावाची कारवाई तुर्तास थांबविण्यात आलेली आहे, असे चर्चेमध्ये ठरलेले आहे.
त्यामुळे संप स्थगित झाला आहे. या चर्चेत भारतीय मजदुर संघ, कामगार युनियन, इंटक युनियन व राष्ट्रीय प्रगतीशील रक्षा कर्मचारी संघ या मान्यताप्राप्त संघटनेचे वरिष्ठ नेते साधू सिंह, मुकेश सिंह, एस.एन.पाठक, श्री.कुमार, अशोक सिंह, आर.श्रीनिवासन, सी.स्वामी आदींनी तर सरकार पक्षातर्फे रक्षा मंत्रालयाचे संचालक संदीप जैन, ओ.एफ.बोर्डाचे नीरज केला, रामचंद्रन, संजय श्रीवास्तव, पुनित अग्रवाल आदींनी सहभाग घेतला.
या निर्णयामुळे तुर्तास संप टळला असला तरी भविष्यात सरकारने खासगीकरण करण्याचा विचार केल्यास संप होणार, असे वरणगाव फॅक्टरीमधील संयुक्त कृती समितीचे सुनील महाजन, महेश पाटील, सचिन चौधरी यांनी कळविले आहे.
तसेच भुसावळच्या आयुध निर्माणीचे संयुक्त स्थानिक संघर्ष समितीचे संयोजक दिनेश राजगिरे यांनी कळविली आहे.