अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गस्थ होणार्या पालख्या समवेत असलेल्या वारकर्यांच्या सुविधांसाठी जिल्ह्यासाठी राज्य सरकारने 2 कोटी 61 लाख 80 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध होणार असून, या निधीतून वारकर्यासाठी वॉटरफ्रूफ मंडप, शौचालय, स्नानगृह, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, आणि ग्रामपंचायत सहाय्य अनुदान दिले जाणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातून पैठण येथील संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृतीनाथ महाराज, पिंपळनेर येथून संत निळोबाराय महाराज या महत्वपूर्ण देवस्थानाच्या पालख्या बरोबरच स्थानिक पातळीवरील सुमारे 160 पालख्या पंढरपूरकडे दरवर्षी जात असतात. यामध्ये महिला-पुरूष वारकर्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. प्रवासादरम्यान मार्गावर गैरसोय होवू नये, म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागील दोन वर्षापासून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने वारकर्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पालखी नियोजन सोहळ्याची बैठक झाली होती. या बैठकीत वरिष्ठ अधिकार्यासह प्रमुख देवस्थानाचे प्रतिनिधी जिल्ह्यातील दिंड्याचे प्रमुख उपस्थित होते. यामध्ये पालखी मार्गावर येणार्या अडचणी मंत्री विखे पाटील यांनी जाणून घेतल्या होत्या. मागील वर्षापासून जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालख्या जाणार्या मार्गांवरुन सर्वसुविधा पुरविण्यात येत असून, यासाठी विविध विभागांचे अधिकारी समन्वयक म्हणून काम करतात. अहिल्यानगर जिल्ह्याने सुरु केलेला हा पॅटर्न राज्यातही चर्चेत आला आहे. सोलापूर जिल्हृयातही पालख्यांकरीता याच पद्धतीचे नियोजन करण्यात येवू लागले आहे.
यामध्ये प्रामुख्याने पावसाचे दिवस असल्याने मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रुफ मंडपाची मागणी, रस्त्याचे प्रश्न, शौचालय, वैद्यकीय सुविधा आणि पिण्याच्या पाण्याबाबतच्या समस्या वारकर्यांनी बोलून दाखवल्या होत्या. यासर्व व्यवस्थांमध्ये प्रशासन कुठेही कमी पडणार नाही, आशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली होती. यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकार्याना दिले होते. सादर झालेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करून मंत्री विखे पाटील यांनी ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी 61 लाख 80 हजार रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिला आहे. शासनाने मंजूर केलेल्या निधीतून वारकर्यांना सर्व मार्गावर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.




