Tuesday, May 21, 2024
Homeनगररेल्वेतून पळण्यापूर्वीच कोतवाली पोलीस पोहचले

रेल्वेतून पळण्यापूर्वीच कोतवाली पोलीस पोहचले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मोक्का गुन्ह्यात पसार असलेल्या सराईत गुन्हेगारांनी नाशिकमधून कार चोरली, त्या कारने नगरमध्ये आले. येथील सराफ बाजारातील वर्मा ज्वेलर्स फोडून सुमारे 25 लाखांचे 41 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरी झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी दिवस-रात्र पाठलाग करून चोरी करणार्‍या टोळीतील दोघांना रेल्वेतून पळून जाणार्‍यापूर्वी नाशिक मधून ताब्यात घेत अटक केली. अक्षयसिंग बिरूसिंग जुनी (वय 22, रा. वैदवाडी, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे), अनमोल चरणसिंग शिकलकर (वय 23 रा. नाशिक रस्ता, सिन्नर फाटा, सिकलकर वस्ती, नाशिक) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

- Advertisement -

त्यांच्याकडून 42.790 ग्रॅम चोरी गेलेले सोन्याचे दागिने आणि सोने विक्रीचे 91 हजार रुपयाची रोकड असा तीन लाख 34 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स या सराफ दुकानाचे शटर उचकटून काही जणांनी रविवारी पहाटे (दि.1) सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 24 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी संतोष सिताराम सहदेव उर्फ वर्मा (रा. माणिकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी चोरट्यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले होते.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांच्या शोधासाठी तीन पथके तात्काळ वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. सराफा बाजारातील दुकान फोडण्यापूर्वी चोरट्यांनी नाशिकमधून कार चोरली होती. चोरीच्या कारमधून नगरमध्ये येऊन सराफा बाजारातील दुकान फोडले. नगर, गंगापूर, वैजापूर या मार्गे चोरटे पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून लक्षात आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. येवल्या नजीक रस्त्याच्याकडेला कार कोतवाली पोलिसांना आढळून आली. तो परिसर कोतवाली पोलिसांनी पिंजून काढला. दरम्यान, कोतवाली पोलिसांना खाबर्‍यामार्फत माहिती मिळाली की गुन्हा केलेले दोघे मुंबईकडे पळून जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांच्या वर्णनावरून ट्रेनची माहिती काढून दोघांना नाशिक येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता दोघांनी इतर सहा साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलिम शेख, शाहीद शेख, इस्राईल पठाण, ए. पी. इनामदार, अमोल गाढे, संदीप थोरात, अभय कदम, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, कैलास शिरसाठ, सतीश शिंदे तसेच दक्षीण मोबाईल सेलचे राहुल गुंड्डू यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पसार सहा जणांचा शोध सुरू

दोघांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले असले तरी त्यांचे सहा साथीदार अजून पसार आहेत. त्यांचा शोध कोतवाली पोलिसांकडून मुंबईसह परभणी, जळगाव जिल्ह्यात घेण्यात आला. परंतु त्यांना अटक करण्यात यश आले नाही. सराईत गुन्हेगार असलेल्या चोरट्यांना अटक करण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांसमोर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या