Saturday, July 27, 2024
Homeभविष्यवेधशुक्र, चंद्राची वरुणवर कृपा!

शुक्र, चंद्राची वरुणवर कृपा!

वरुण धवनचा जन्म 24 एप्रिल 1987 रोजी झाला. चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड यांचा तो पुत्र. इंग्लंडच्या नॉटिंगहम ट्रेंट विद्यापीठातून व्यवसाय अभ्यासाक्रमाचा तो पदवीधर. अभिनयात पाऊल टाकण्यापूर्वी तो माय नेम इज खान (2010) या चित्रपटासाठी त्याने करण जोहरचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. वरुणची अभिनय कारकिर्द सध्या बहरात आहे. अनेक हिट चित्रपटांमुळे तो चर्चेत असतो. फिल्मफेअरच्या राहुल गंगवानी त्याचे वर्णन संपूर्ण पॅकेज असे करतात. चित्रपटांच्या निवडीबाबत तो अत्यंत सावध असतो. त्यामुळे अभिनेता म्हणून त्याने प्रेक्षक आणि दिग्दर्शकांची मने जिंकली आहेत. भारतातील सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींपैकी तो एक आहे. भारतातील सर्वात 50 प्रभावशाली तरुणांमध्ये फोर्ब्सने वरुणचा समावेश केला होता. भविष्यवेध मालिकेत मागच्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अंकात आपण मनोज वाजपेयी या अभिनेत्याचा आयुष्यातील संघर्ष पहिला. मोठ्या संघर्षातून नावारूपास आलेला अभिनेता म्हणून त्यांचा भविष्यवेध अभ्यासला. आज आपण वरुण धवन या जमतःच नशीब घेऊन आलेल्या अभिनेत्याच्या हातावरील ग्रह रेषांचा भविष्यवेध पाहणार आहोत.

आयुष्यात व्यक्तीचा उत्कर्ष कधी व केव्हा यासाठी भविष्यवेध मालिकेत आपण आयुष्य रेषेवर बोटांकडे जाणार्‍या बारीक बारीक रेषा ह्या उत्कर्ष रेषा असतात हे वाचकांनी जाणून घेतले. सर्व सामान्य लोकांच्या हातावर आयुष्य रेषेतून बोटांकडे जाणार्‍या उत्कर्ष रेषा दोन ते तीन असतात. एकूण शंभर वर्षांच्या आयुष्यात आयुष्य रेषेतून उगम पावणार्‍या रेषा सर्वसाधारण वय वर्ष 25, 35, 50 च्या दरम्यान असतात. ज्या व्यक्तींचा सातत्याने दरवर्षी उत्कर्ष होत असतो. त्यांच्या आयुष्यरेषेवरील उत्कर्ष रेषा छोट्या छोट्या व लागोपाठ असतात. ज्या वय वर्षांत आयुष्य रेषेवर उत्कर्ष रेषेत खंड आहे. त्या वय वर्षात त्या व्यक्तीच्या आयुष्यात उत्कर्ष असत नाहीत. म्हणजेच ज्या वय वर्षात उत्कर्ष रेषेचा अभाव आहे त्या वय वर्षात उत्कर्ष होत नाही. वरुण धवन यांचे आयुष्यरेषेतून वय वर्ष 25 पासून उत्कर्ष रेषा आहे व पुढे आयुष्य रेषेवर वय वर्ष 60 पर्यंत सातत्याने उत्कर्ष रेषा आहेत. आयुष्य रेषेवर एका पाठोपाठ उत्कर्ष रेषा असतील तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात दर वर्षी उत्कर्षात भर पडते. ती व्यक्ती दरवर्षागणिक आपले नवीन ध्येय गाठण्यात यशस्वी होत असते. वरूण यांचे हातावरील सर्वात मोठी उत्कर्ष रेषा व धनरेषेचे कारकत्व घेऊन आलेली आहे, ती वय वर्ष 45 ला आहे. धवन यांचे हातावरील सर्वात भाग्यशाली उत्कर्ष रेषा वय वर्ष 45 ला आहे व ती आयुष्य रेषेतून उगम पाऊन थेट मधल्या बोटाच्या खाली म्हणजे शनी ग्रहावर गेल्याने त्या रेषेस धन रेषेचे कारकत्व लाभले आहे. धवन यांचे आयुष्य रेषेवर वय वर्ष 45 नंतर 50, 55 व 60 वयाच्या दरम्यान परत उत्कर्ष रेषा आहेत. त्यामुळे वरूण यांचे आयुष्यात सातत्याने उत्कर्षाचे दिवस आहेत. मधल्या बोटाच्या खाली म्हणजेच शनी ग्रहावर आडवी रेषा असेल तर व्यक्तीच्या उत्कर्षात कायम अडथळे येतात व तिच्या जीवनात उतुंग यश मिळण्यास कायम अडथळे येतात. शनी ग्रहावरील आडवी रेषा किंवा रेषेचा तुकडा हा हृदय रेषेचा असता उत्कर्षात अडचणी येतात. हृदय रेषेचा शनी ग्रहावरील आडवा तुकडा जितका रुंद व ठळक असेल तितके त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अडथळे तीव्र असतात. परंतु हृदय रेषेचा तुकडा बारीक व अर्धाच शनी ग्रहाचा भाग व्यापला असेल तर अडथळ्यांची तीव्रता कमी असते. वरूण यांच्या हातावरील शनिग्रहावर आडव्या रेषा आहेत परंतु त्या हृदय रेषेचा तुकडा किंवा हृदय रेषेचे फाटे नसल्याने ते वरुण यांच्या उत्कर्षात अडथळे आणणारे नाहीत.

- Advertisement -

वरुण यांच्या शनी व रवी ग्रहावर आडव्या 5 पातळ थोड्या गोलाकार बाक घेतलेल्या रेषा आहेत, ते शुक्र वलय आहे. शुक्र वलय हाताच्या तिसर्‍या बोटापासून पहिल्या गुरु व रवी बोटाच्या पेरात जाऊन थांबते. शुक्र वलय अखंड असू शकते, म्हणजे शुक्र वलयाची रेषा एकच अर्ध गोलाकार असू शकते. शुक्र वलय रवी व शनी ग्रहाच्या म्हणजे मधल्या दोन बोटांच्या खाली संपूर्ण ग्रहावर आडव्या तुकड्या तुकड्याच्या स्वरूपात किंचित बोटांकडे गोलाईयुक्तसुद्धा असते. बुध ग्रहाच्या समाप्तीनंतर व गुरु ग्रहापर्यंत असलेले वलय शुक्र वलय म्हणून ओळखले जाते. कारण या वलयात शुक्र ग्रहाचे गुणधर्म समाविष्ट असतात. शुक्र ग्रहाच्या कारकत्वात शुक्र वलय हे ,प्रणय विलासी, कामक्रीडाशी संबंधित आहे. शुक्र वलय रवी, शनी, गुरू ग्रहांच्या दरम्यान बोटांखाली असले तरी त्यास शुक्र ग्रहाचे गुणधर्म बहाल असल्याने या अर्ध गोलाकार असलेल्या रेषांच्या समूहास शुक्र वलय नाव दिले गेले. हातावरील शुक्र ग्रहाचे स्थान आयुष्य रेषेच्या आत, अंगठ्यापासून मणिबंधापयर्र्ंत असलेल्या फुगीर भागात शुक्र ग्रहाचे स्थान असते. शुक्र ग्रहाच्या कारकत्वात अध्यात्मसुद्धा समाविष्ट आहे. त्यामुळे अखंड एका रेषेने तयार झालेले शुक्र वलय पहिल्या बोटापासून तिसर्‍या बोटापर्यंत असता ते अध्यात्मात उंची गाठण्यात मदत करते. म्हणजे त्यात अध्यात्माचे गुणधर्म ही समाविष्ट असतात.

शुक्रवलय असता गुरु ग्रह जर शुभ फलित प्रदान करीत असेल तर व्यक्ती विषय वासनेच्या आहारी जात नाही, मन भरकटले तरी प्रत्यक्ष कृती करीत नाही. वरुणचा गुरु ग्रह शुभदायी आहे. गुरु ग्रहावर चौकोन चिन्ह आहे, हे चौकोन चिन्ह विद्वत्ता बहाल करते. कुठलीही गोष्ट किंवा विषय सहजी उमगतो, समजतो व दुसर्‍या व्यक्तीला सांगितलेल्या कल्पना त्या कोणत्याही क्षेत्रातील असो त्याचा फायदा समोरच्या व्यक्तीला झाल्या वाचून राहत नाही. वरूण यांची हृदय रेषा शनी ग्रहाच्या मध्यापर्यंत आल्यानंतर तिला दोन बारीक व तलम फाटे आहेत. एक फाटा सरळ गुरू ग्रहावर जाऊन थांबला आहे व दुसरा मस्तक रेषेला छेद देऊन वरच्या मंगळ ग्रहावर जाऊन थांबला आहे. हृदय रेषेचा एखादा फाटा मस्तक रेषेवर जाऊन थांबत असेल तर अशा व्यक्ती निश्चितच प्रेमात पडतात. हृदय रेषेचा फाटा मस्तक रेषेला छेदून वरच्या मंगळ ग्रहावर गेला तर प्रेमात वेदना सहन कराव्या लागतात व विवाहास विरोध होतो, विवाहानंतर काही दिवस नाती दुरावतात. वरुण यांचा प्रेम विवाह झाला आहे, त्यांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले व या लग्नास निश्चितच विरोध झाला असणार व मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागले असणार.

वरूणची मस्तक रेषा व आयुष्य रेषा वय वर्ष 28 पर्यंत एकत्र आहेत व त्यानंतर मस्तक रेषा स्वतंत्र झाली आहे. अशी स्थिती असता असे लोक वडीलधार्‍यांच्या शब्दाच्या बाहेर नसतात. त्यांचा आदर करतात. त्यामुळेच कि काय आधी वरुणने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अनुभव घेतला. परदेशात पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले व नंतरच अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. मस्तक रेषा तिरकी होऊन थेट चंद्र ग्रहावर उतरल्याने कलेचे व अभिनयाचे गुण प्राप्त झाले आहेत. त्याचा कल्पना विलास मोठा आहे व त्याचाच फायदा अभिनेता बनण्यात सहाय्यक झाला आहे.

हातावरील आयुष्य रेषा दमदार असल्याने त्यांच्यात शारीरिक क्षमता अधिक आहे. अंगठा मजबूत आहे. अंगठ्याचे पहिले व दुसरे पेर शुभ फलित देणारे असल्याने, पहिल्या पेर्‍याने कल्पनाशक्ती अफाट दिली आहे व दुसरे पेर्‍याने आलेली कल्पना आळस न करता कृतीत उतरवण्याची मानसिक दिली आहे. वरून धवन सर्वात व्यस्त व सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्यांपैकी एक आहे. पुढचा आयुष्याचा प्रवास उज्ज्वल आहे.

वरुणचेे वडील डेव्हिड धवन चित्रपटसृष्टीतील एक नामांकित निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यामुळे वरुणचा रुपेरी पडद्यावरील प्रवेश सहज झाला. चित्रपटांना मायबाप प्रेक्षकांनी पसंती दिली नाही तर चित्रपटातील नायकाला प्रसिद्धी मिळत नाही किंवा तो जनतेच्या पसंतीशिवाय अभिनेता होऊ शकत नाही. याचाच अर्थ असा कि अभिनयाच्या क्षेत्रात स्थान मिळविण्यासाठी स्टारपुत्र किंवा दिग्गज निर्मात्याचा पुत्र म्हणून जनता स्वीकारीत नाही तर, अभिनेत्याच्या अभिनयातील कलागुणांनी तो जनतेच्या पसंतीस उतरत असतो. रुपेरी पडद्यावर नाव कमवायला मेहनत लागते व ही मेहनत घेण्याची महत्वाकांक्षा वरुणकडे असल्यानेच तो आज यशस्वी आहे. प्रत्येक व्यक्तीला मेहेनतीबरोबर नशिबाची साथ असावी लागते व ती वरूण यांना मिळाली आहे. वरूण यांच्या हातावरील शुभकारक शुक्र ग्रहाने ऐश्वर्य, व्यक्तिमत्व व सौंदर्य दिले, शुभकारक चंद्र ग्रहाने अभिनयाचे गुण प्रदान केले. वरुण यांच्या हातावरील रवी रेषेचा उगम आयुष्य रेषेतून होत असल्याने या रवी रेषेने सर्व दूर कीर्ती, मान सन्मान व पारितोषिके मिळवून दिली.

हातावर दोन भाग्य रेषा आहेत. नंबर एकची भाग्य रेषा आयुष्य रेषेच्या जवळून जन्मापासूनच शुभकारक असून या भाग्य रेषेला शुक्र ग्रहावरून एक फाटा येऊन मिळत आहे. त्यामुळे वरूणच्या जन्माच्या अगोदरपासूनच त्यांच्या वडिलांची आर्थिक क्षमता मोठी होती. वरूणच्या हातावरील ही पहिली भाग्य रेषा हृदय रेषेत जाऊन थांबली आहे. म्हणजेच त्याला स्वतःच्या कमाई व्यतिरिक्त वडिलांच्या कमाईचा लाभ वय वर्ष 55 पर्यंत मिळत राहणार आहे. हातावरील स्वतःच्या आर्थिक लाभाची भाग्य रेषा आयुष्य रेषेतून वय वर्ष 50 ला उगम पावत असून वयाच्या पन्नासाव्या वर्षी वरुणच्या आयुष्यात उत्कर्षाच्या सर्वोच्च बिंदूला असतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या