Saturday, November 23, 2024
Homeराजकीयवसंत मोरे हाती बांधणार शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला

वसंत मोरे हाती बांधणार शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला

मुंबई । Mumbai

पुणे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर उमेदवारी लढवणारे उमेदवार वसंत मोरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा मुहूर्तदेखील निश्चित झाला आहे. पुढील आठवड्यामध्ये ९ जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेना पक्षात वसंत मोरेंचा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे पक्ष व नेते राज ठाकरे यांची साथ सोडली. यावेळी देखील त्यांनी महाविकास आघाडीसोबत बोलणी केली होती. मात्र ही बोलणी काही यशस्वी होऊ शकली नाही. आधी अपक्ष आणि नंतर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढली. मात्र यामध्ये त्यांचा मोठा पराभव झाला. अगदी त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं होते. आता वसंत मोरे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

हे देखील वाचा : शेअर मार्केटमध्ये कोटींची गुंतवणूक, एकही कार नाही; पंकजा मुंडेंची संपत्ती नेमकी किती?

२०१९ मध्ये वसंत मोरेंनी मनसेच्या तिकिटावर हडपसरमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ३४ हजार ८०९ मतं घेतली. त्यांना केवळ १४.६२ टक्के मतं पडली. पण त्यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपेंना फायदा झाला. तुपे यांना ९२ हजार ३२६ मतं मिळाली. तर भाजपच्या योगेश टिळेकरांना ८९ हजार ५०६ इतकं मतदान झालं. मोरे यांच्यामुळे झालेल्या मतदानाचा लाभ तुपे यांना झाला.

हे देखील वाचा : लोकसभेनंतर राज्यसभेतही पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “अजून २० वर्षे…”

मनसेत असताना पुणे शहराध्यक्ष असणाऱ्या मोरेंनी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे. २००७, २०१२ आणि २०१७ असे सलग तीनदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. अशी कामगिरी मनसेच्या अन्य कोणत्याही नगरसेवकाला जमलेली नाही. राज ठाकरेंचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. पण राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबद्दल घेतलेल्या भूमिकेनंतर ते नाराज झाले. त्यानंतर राज यांनी लोकसभा न लढवण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या