नाशिक / पंचवटी / प्रतिनिधी Nashik
नाशिकमध्ये होळीच्या दुस़र्या दिवशी दाजीबा वीराची मिरवणुक काढण्याची तीनशे वर्षांचीही परंपरा आजही कायमआहे. विविध देवदेवतांच्या वेशात सहभागी झालेले हे वीर आपल्या घरातल्या देवांना स्नान घालण्यासाठी पंचवटीतील गोदातीरी दाखल झाले.डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, हातात सोन्याचे कडे, पायात जोडा अशी वेशभूषा धारण करून वाजत गाजत या वीर दाजीबांची मिरवणूक निघाली. घरासमोर रांगोळी काढत तसेच ठिकठिकाणी औक्षण करत या दाजिबांचे स्वागत करण्यात आले. दाजिबांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. दाजिबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
जुने नाशिक आणि पंचवटी परिसरातून निघालेल्या वीरांच्या मिरवणुकांनी शहर भक्तिमय झाले. बुधवार पेठेतील बेलगावकर कुटुंबाचा दाजिबा वीर आणि घनकर गल्लीतील मोरे कुटुंबीयांचा येसूजी वीर यांच्या मिरवणुकीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाद्यांच्या गजरात, भक्तिरसपूर्ण वातावरणात आणि मोठ्या जल्लोषात या मिरवणुका पार पडल्या.
परंपरा जपणाऱ्या वीर मिरवणुका
औद्योगिक क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या नाशिक शहराची धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा मात्र टिकून आहे. विशेषतः शिमग्याच्या निमित्ताने होणाऱ्या वीर मिरवणुका ही नाशिकची एक अनोखी परंपरा आहे. धुलिवंदनाच्या दिवशी घराघरातील देवघरातून वीर (पूर्वजांचे टाक) बाहेर काढून त्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा इथे आजही टिकून आहे.
यासोबतच शहरातील काही मानाच्या वीरांच्या मिरवणुकांनाही विशेष महत्त्व असते. नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध असलेले दाजिबा (बाशिंगे) वीर आणि येसोजी वीर यांच्या दर्शनासाठी हजारो भाविक उपस्थित होते. अनेकांनी नवस बोलले तर काहींनी नवसपूर्तीचा विधी पार पाडला. विशेषतः दाजिबा वीराला बाशिंग बांधण्याची प्रथा असून, त्याद्वारे नवस फेडल्याची भावना असते.
गोदाघाटावर यात्रेचा माहोल
सायंकाळी पाचनंतर घराघरातील वीर मिरवणुका रामतीर्थाच्या दिशेने निघाल्या. या मिरवणुकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भगवान शंकर, श्रीराम-लक्ष्मण अशा वेशभूषेतील चिमुकले वीर लक्षवेधी ठरले. भाविकांनी या लहानग्या वीरांचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर टिपले.
मिरवणुकांच्या निमित्ताने गोदाघाटावर विविध खाद्यपदार्थ आणि खेळण्यांचे स्टॉल्स मोठ्या संख्येने लावण्यात आले होते. संध्याकाळच्या सुमारास रामतीर्थावर वीरांना स्नान घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यात घराघरातील वीरांसह शहरातील मानाच्या वीरांचाही समावेश होता.
वीरांचा सन्मान आणि पूजन सोहळा
नाशिक संस्कृती संवर्धन समितीतर्फे गोदाघाटावरील मुक्तेश्वर महादेवाजवळ वीर आणि त्यांचे कुटुंबीय यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात माजी नगरसेवक शाहू खैरे, अशोक मुर्तडक, यतीन वाघ, देवांग जानी, नंदकुमार मुठे, तानाजी जायभावे, बबलू खैरे, बाळासाहेब गामणे यांनी उपस्थित राहून वीर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या वेळी वरद विनायक आणि शिवकन्या ढोल पथकांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. वीर मिरवणुकांमुळे नाशिकच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले आणि भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हा उत्सव साजरा केला.