कर्जत |प्रतिनिधी| Karjat
तालुक्यातील चापडगाव येथे सोमवारी(दि.10) अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जातेगाव येथील आहे.
मृतांमध्ये बापू उर्फ सत्कार बाळासाहेब ससाणे (वय 18) आणि छोटू सुरेश पोळ ( वय 22) या दोघांचा समावेश आहे, तर अक्षय बीठू जगताप (वय 22) हा गंभीर जखमी झाला असून त्याला करमाळा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, हे तिघे युवक जातेगाव येथून दुचाकीवरून कर्जत तालुक्यातील चापडगावकडे येत होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की ससाणे आणि पोळ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. अपघातात मृत झालेले दोन्ही युवक गरीब शेतकरी कुटुंबातील असल्याचे समजते. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




