रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत (pandit ramdas kamat)यांचं शनिवारी रात्री वृध्दापकाळानं निधन (passed away)झालं. ते 90 वर्षांचे होते. पंडित रामदास कामत यांनी धी गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. कौस्तुभ कामत, सून डॉ. संध्या कामत, नातू अनिकेत, नातसून भव्या असा परिवार आहे.
रामदास कामत हे मूळचे गोव्याचे. १८ फेब्रुवारी १९३१ म्हापसा येथे जन्म झाला. व्यावसायिक मराठी संगीत रंगभूमीवर अभिनेता आणि गायक म्हणून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आपली नाममुद्रा केवळ नाटय़संगीतावरच नव्हे तर भावसंगीत, चित्रपट संगीत आणि लोकसंगीतावरही ज्यांनी तेवढय़ाच समर्थपणे उमटविली.
भीमसेन जोशींकडून घेतले धडे
पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या हाताखाली त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. तर यशवंत देवांकडून त्यांनी भावगीत शिकून घेतले. संगीताचा गाढा अभ्यास केलेल्या पंडित रामदास कामत यांनी धि गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत मदनाची मंजिरी’, ‘संगीत एकच प्याला’, ‘संगीत मंदारमाला’, ‘संगीत होनाजी बाळा’ अशा जवळपास अठरा संगीत नाटकांमधून काम केले होते.