नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एकीकडे एनडीएच्या आणि दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू असल्यामुळे घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल व मुळचे तामिळनाडूचे सीपी राधाकृष्णन हे एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत. तर विरोधकही तामिळनाडूमधूनच उमेदवार देण्याची तयारी करत आहेत. डीएमकेने विचारधारेमुळे राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. यावरून भाजपा टीका करत असतानाच डीएमकेचाच उमेदवार देण्याची तयारी विरोधक करत असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीकडून कोण उमेदवार असणार याबाबत चर्चा सुरु आहे. या पार्श्वभुमीवर दिल्लीत बैठकांचा धडाका सुरु आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज संध्याकाळी महत्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे विरोधक उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे की या संदर्भातील निर्णयाबाबत आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर विरोधकांची भूमिका समोर येईल. तसेच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी काय भूमिका घेतात हे देखील महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांना एनडीएने उमेदवार केले आहे. पक्षीय बलाबलानुसार राधाकृष्णन यांचेच पारडे जड आहे. यामुळे महाराष्ट्राचे देखील राज्यपाल बदलण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीपेक्षा एनडीएचीच ताकद जास्त आहे. एनडीएकडे ४२७ लोकसभा, राज्यसभा खासदारांचा पाठिंबा आहे. तर विरोधकांकडे ३५४ खासदार आहेत. यामुळे राधाकृष्णन यांचा विजय पक्का मानला जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




