मुंबई | Mumbai
विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) दहा जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (दि.३० एप्रिल) रोजी शेवटचा दिवस असून, भाजपकडून (BJP) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर महायुतीमधील शिंदे सेना आणि राष्ट्रवादीचा उमेदवार आज (बुधवार) सायंकाळपर्यंत निश्चित होऊ शकतो. तर मविआकडून ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उमेदवार असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता उद्धव ठाकरे विधानपरिषदेची निवडणूक लढवणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे सेनेने (Shivsena UBT) उद्धव ठाकरे यांच्याऐवजी माजी आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) हे विधानपरिषदेसाठी उमेदवार असणार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या आधीही दानवे यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेले आहे. त्यामुळे आता मविआतील घटक पक्ष असणारे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी (Congress and NCP SP) अंबादास दानवे यांच्या नावाला सहमती दर्शवितात का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, अंबादास दानवे हे उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. काही महिन्यांपूर्वीच दानवे यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेतील (Vidhan Parishad) कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, आता अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने हा सस्पेन्स संपला आहे.
भाजपकडूनही उमेदवार जाहीर
विधानपरिषद निवडणुकीसाठी काल (मंगळवारी) भाजपने सुनिल कर्जतकर, डॉ. माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी दिली आहे. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून (Congress) भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे.
कोणाच्या वाट्याला किती जागा येणार?
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ६, शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम-
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे – २३ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल २०२६
उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ४ मे २०२६
मतदानाची तारीख – १२ मे २०२६
मतदानाची वेळ – सकाळी ९ वाजेपासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी – १२ मे २०२६ संध्याकाळी ५ वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख – १३ मे २०२६





