मुंबई | Mumbai
विधान परिषदेच्या जागेसाठी कुणाला संधी द्यायची यावरून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रणकंदन सुरू असताना राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या पोस्टची किंबहुना सुचवलेल्या पर्यायाची राज्यात चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. विधानपरिषद मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची देखील मुदत संपत आहे. या निवडणुकीबाबत त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
अजित पवारांची उणीव भरुन काढण्याची क्षमता जय पवारांमध्ये
विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पक्षाकडून जय पवार यांना पाठवावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. अजित पवार यांची उणीव भरून काढण्याची क्षमता जय पवार यांच्यात असल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवावे असे मिटकरींनी म्हटलेय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी संध्याकाळी कोअर कमिटीची बैठक होणार आहे. बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. पक्षात विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्धकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते व नेत्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग व चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्ष वाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासू व युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थिती जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे. कदाचित इतरांना घराणेशाही वाटेल ते वाटू देत मात्र दादा नंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी दादांसारखाच आश्वासक वाटतो. दादांची उणीव भरून करण्याची क्षमता असलेला हा चेहरा राष्ट्रवादी पक्षासाठी संजीवनी ठरेल. अर्थात अंतिम निर्णय पक्षाचा असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
जो बीत गया है वो अब दौर ना आयेगा| इस दिलमे सिवा तेरे कोई और न आयेगा| घर फुंक दिया हमने अब राख उठानी है| जिंदगी और कुछ नही तेरी मेरी कहानी है|| असे ट्विट करून अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या आठवणी जागवल्या.





