मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी (२७ एप्रिल) कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह इतर रिक्षा टॅक्सी चालक संघटनासोबत मंत्रालयात बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली आहे. राज्यातील विविध रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर किमान जुजबी मराठी येणे आवश्यक आहे. मात्र यामुळे कोणाच्याही रोजगारावर गदा येणार नाही, याचीही सरकार काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“धक्कादायक! बिर्याणीवर कलिंगड खाणं ठरलं मृत्यूचं कारण? एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू”
मंत्री सरनाईक म्हणाले की, “आजही मी मराठीच्या विषयावर ठाम आहे. आज जी बैठक झाली ती या निर्णयाला विरोध करणाऱ्यांसोबतच झाली. पण, त्यांनीही माझ्या भूमीवर सहमती दर्शवली. आज जे हिंदी भाषिक लोकं आले होते, तेदेखील चांगले मराठी बोलतात. शशांक राव हे मुळचे कर्नाटकचे आहेत. ते म्हणाले की, मी कर्नाटकात गेल्यानंतर माझ्या आईशी मी कानडी भाषेत बोलतो. तुम्ही जसे तुमच्या मातृभाषेवर प्रेम करता, तसे मी केले तर वावगे काय?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले.
ते पुढे म्हणाले की, “संजय निरुपमही होते. त्यांना मी म्हणालो की तुम्ही आधी हिंदी सामनाचे संपादक होतात. तुम्हाला वाटले की, बाळासाहेब ठाकरे कदाचित तुम्हाला मराठी सामनाचे संपादक करतील, म्हणून तुम्ही किती चांगले मराठी शिकलात. हे हिंदी भाषिक नेते जर मराठी चांगले बोलू शकतात, मग रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठीत का बोलू नये?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
भक्ति रसात न्हाऊन निघाली विदेशी पाहूणी; अंबानींच्या घरी रिहानाने केली आरती, फुलांची उधळण अन्…
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात राहून फक्त हिंदीच बोलू, हे चालणार नाही. मराठीचा सन्मान आणि प्रसार होणे गरजेचे आहे. ही कोणतीही राजकीय घोषणा नाही, तर मराठी भाषेचा प्रचार आणि व्यवहारात तिचा वापर वाढवण्याचा प्रयत्न आहे.”
दरम्यान, मिरा-भाईंदर परिसरातील रिक्षा-टॅक्सी परवान्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 3,065 परमिटधारकांची पडताळणी करण्यात आली. यापैकी 499 चालकांना मराठी येत नसल्याचं आढळून आलं, तर 2567 जणांना मराठी बोलता येत असल्याचे समोर आले.
“रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींनी मुदत वाढ मागितली आहे. मात्र, याबाबत उद्या म्हणजेच मंगळवारी, २८ एप्रिल रोजी प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांशी बैठक घेतल्यानंतर निर्णय घेऊ,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. “हा निर्णय पुढे ढकलण्यासाठी अनेकांनी वेगवेगळी मुदत मागितली होती. कोणी एका वर्षाची कोणी सहा महिन्याची तर दुसऱ्या कोणी तीन महिन्याची, ही मुदत नेमकी कधी पर्यंत मिळेल हे ठरवू” असे ते म्हणाले. तसेच, “आम्ही मराठी शिकणारच नाही, हा आडमुठेपणा चालणार नाही. मराठी शिकावीच लागेल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.





