Saturday, October 5, 2024
HomeनगरVidhan Sabha Election 2024 : श्रीरामपूर - संगमनेर वगळता १० जागांसाठी २१...

Vidhan Sabha Election 2024 : श्रीरामपूर – संगमनेर वगळता १० जागांसाठी २१ इच्छुक

अहमदनगर (प्रतिनिधी)

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि संगमनेर वगळता अन्य १० मतदारसंघातून २१ इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. या इच्छुकांच्या सोमवारी (दि. ७) पुणे येथे शरद पवार मुलाखती घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली. यावेळी २३ सदस्य संसदीय मंडळ (पार्लमेंटरी बोर्ड) त्यांच्या मदतीला राहणार आहे.

- Advertisement -

नगर येथे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना फाळके म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरून महायुतीविरोधात प्रचाराला धार देण्याची तयारी केलेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील इच्छुकांकडून मतदारसंघनिहाय अर्ज मागावले होते. यात जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघापैकी १० मतदारसंघातून २१ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

सोमवारी दुपारी साडेचार वाजता पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील २३ सदस्यांचे पार्लमेंटरी बोर्ड इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. त्यानंतरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होईल. दरम्यान, जिल्ह्यातील शरद पवार गटाने जागा ८ मागितल्या आहेत. यात महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडील शिर्डी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यास त्या बदल्यात काँग्रेसला पर्यायी मतदारसंघ देण्याची तयारी असल्याचे फाळके म्हणाले. दरम्यान, कोपरगाव मतदारसंघातून दोन इच्छुक तर नगर शहर विधानसभा मतदारसंघातून तीन इच्छुकांची नावे आलेली आहेत. मात्र, यावेळी उमेदवार कोण याबाबतचा उत्कंठा वाढली आहे.

नगर-कोपरगावकडे नजरा

कोपरगावातून विवेक कोल्हे संपर्कात आहेत का, या प्रश्नावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत. आताच त्यांच्याबाबत स्पष्टपणे बोलणे उचित नाही. लवकरच कोपरगावचे चित्र स्पष्ट होईल, असेही फाळके यांनी सांगितले. तसेच नगर शहरातून पक्षाला विजय हवाच आहे. सध्या कळमकर, डॉ. आठरे, तांबोळी यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र अन्य कोणी मागणी केली तर याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेऊ शकतात, असे सांगून फाळके यांनी केडगावकरांचा सस्पेन्स कायम ठेवला. तसेच पक्षासाठी सकारात्मकच होईल, असे सांगितले. यामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी गटाचा कोपरगाव आणि नगरचा उमेदवार कोण याकडे राज्याचे लक्ष राहणार आहे.

संगमनेर – श्रीरामपूर दावाच नाही

शेवगाव-पाथर्डीतून प्रताप ढाकणे यांची उमेदवारी अंतिम समजली जात आहे. मात्र मध्यंतरी माजी आमदार चंद्रशेखर घुले हे देखील तुतारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू होती. यावर फाळके यांनी मलाही तसं समजलं, मात्र ढाकणे हेच उमेदवार असल्याचे सांगून त्यांनी घुलेंच्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शरद पवार गटाने आवाहन केल्यानंतरही संगमनेर आणि श्रीरामपुरातही एकही इच्छूक पुढे आलेला नाही. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे असलेल्या या दोन मतदारसंघांवर पवार गटाचा कोणताही दावा नसणार हे स्पष्ट होत आहे.

श्रीगोंद्यात शिवसेनेचा संबंध नाही

श्रीगोंदा विधानसभेसाठी राहुल जगताप यांच्यासह आणखी काही इच्छुक आहेत. ही जागा पूर्वी राष्ट्रवादीनेच लढविलेली आहे. त्यामुळे ही जागा आम्ही लढविणार आहोत. ती शिवसेनेला सोडण्याची अशी कोणतीही तडजोड झालेली नसल्याचेही फाळके यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे देखील आमच्या संपर्कात असल्याचे सांगत, तसेच शरद पवार गटाचे ध्येय हे अजित पवार गटाकडे असणारे विद्यमान आमदार पाडणे हेच आहे. यामुळे त्यादृष्टीने शरद पवार नियोजन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अकोलेत ऐनवेळी बदल

अकोले तालुक्यातून शरद पवार गटाकडून दोन इच्छुकांची नावे आलेली असली तरी ऐनवेळी याठिकाणी वेगळाच उमेदवार समोर येण्याची चिन्हे आहेत. याठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तगडा उमेदवार देण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. फाळके यांच्यावतीने या विषयावर बोलण्यास नकार देण्यात आला.

हे आहेत इच्छुक

अकोले : अमित भांगरे, मधुकर तळपाडे.
कोपरगाव : दिलीप लासुरे, संदीप वर्षे. शिर्डी रणजित बोठे, अॅड. नारायण कार्ले.
नेवासा : डॉ. वैभव शेटे.
शेवगाव- पाथर्डी : प्रताप ढाकणे, विद्या गाडेकर
पारनेर : राणी लंके, रोहिदास कर्डिले, माधवराव लामखडे,
नगर शहर : डॉ. अनिल आठरे, अभिषेक कळमकर, शौकत तांबोळी.
श्रीगोंदा : बाबासाहेब भोस, राहुल जगताप, निवास नाईक, आण्णासाहेब शेलार.
कर्जत: आ. रोहित पवार.
राहुरी : आ. प्राजक्त तनपुरे

- Advertisment -

ताज्या बातम्या