नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले उमेदवार व गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करत असलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याशिवाय येत्या दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विचार करू असे करंजकर यांनी म्हटले. तसेच लोकसभा निवडणूक लढणार व विरोधकाला पाडणार, असा निर्धारही विजय करंजकर यांनी यावेळी व्यक्त केला…
शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची यादी (List of Lok Sabha Candidates) आज सकाळी प्रसिद्ध करण्यात आली.मात्र, या यादीत निवडणूक (Election) लढविण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार विजय करंजकर यांचे नाव प्रसिद्ध झाले नाही. त्यांच्याऐवजी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघाची ठाकरे गटाची उमेदवारी घोषित करण्यात आली. या घोषणेनंतर करंजकर यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे शेकडो समर्थक त्यांच्या निवासस्थानी तसेच नाशिकरोड येथे जमले. त्यानंतर याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
मोठी बातमी! नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी
यावेळी बोलताना करंजकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. मी खुद्दार आहे, पण गद्दार नाही असे बोलून ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीसाठी मी गेल्या अनेक महिन्यापासून तयारी करत आहे व याबाबत मला शिवसेना नेत्यांनीच तयारी करण्याचे आदेश दिले होते. मी निवडणूक लढण्यासाठी २०१४ व २०१९ पासून इच्छुक होतो. दोन्ही वेळा मला थांबविण्यात आले. प्रत्येक वेळी पक्षाशी प्रामाणिक राहिलो व पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. मला जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, महापालिका, विधानसभा लोकसभा (Loksabha) या सर्व निवडणुकीचा अनुभव आहे. अनेकवेळा लोकसभा निवडणुकीसंदर्भात जो सर्वे झाला त्यात माझे नाव नेहमीच अग्रेसर होते. जे इच्छुक नव्हते त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारे अन्याय सहन करणार नाही. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी अजून भरपूर वेळ आहे, जो निर्णय घेईल तो जिंकण्यासाठीच घेईल असा विश्वास करंजकर यांनी व्यक्त केला.
तसेच माझे तिकीट कापण्यामागे कोणाचा हात आहे हे सुद्धा मी तपासून पाहणार आहे. मी आत्तापर्यंत कोणावरही अन्याय केला नाही. मात्र, माझ्यावर जो अन्याय झाला तो माझे समर्थक सहन करणार नाही, असे बोलून विजय करंजकर म्हणाले. तसेच येत्या दोन दिवसात मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करेल व त्यानंतर निर्णय घेईल. मात्र, आपण निवडणूक लढणार आणि विरोधकाला पाडणार असा ठाम विश्वास करंजकर यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी माजी आमदार योगेश घोलप (MLA Yogesh Gholap) तसेच संजय तुंगार, चंद्रकांत गोडसे, नितीन चिडे, योगेश देशमुख यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
‘वंचित’ मविआतून बाहेर; लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा