शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi
राजकारणातील काही तथाकथित समाजकंटकांनी आपल्याला बदनाम करण्यासाठीच अपहरण नाट्याचा बनाव घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून अपहरणाचे नाट्य घडवून आणणार्यांचा खरा मुखवटा न्यायालयाच्या माध्यमातून लवकरच समाजासमोर येणार असल्याचा विश्वास साईनिर्माण उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजयराव कोते यांनी व्यक्त केला.
मनसेचे नगरसेवक दत्तू कोते यांच्या अपहरण प्रकरणी तब्बल एका वर्षानंतर साईभक्त विजयराव कोते यांना आरोपी करण्यात आल्यानंतर श्री. कोते स्वत:हून लोणी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. दरम्यान तब्बेतीच्या कारणास्तव कोते यांना लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आज राहाता येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोते यांची जामिनावर मुक्तता केली.
विजय कोते यांची जामिनावर मुक्तता होताच शिर्डीतील आणि परिसरातील कोते यांच्या चाहत्यांनी जल्लोष केला. न्यायालयाच्या बाहेर आल्यावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विजय कोते यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, वर्षभरापूर्वी शिर्डी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या दरम्यान आर्थिक लालसेपोटी अपहरणाचे नाट्य घडवून आणले गेले.
या अपहरण नाट्याशी आपला काडीमात्र व दुरान्वयानेही संबंध नसताना आणि पुन्हा नगराध्यक्ष निवडीच्या चर्चेच्या काळात आपले नाव या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्याचा निंदनीय प्रकार झाला. शिर्डीतील नगराध्यक्ष पदाची स्वप्न पाहणार्यांनी या नाट्यास खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. याचे दुःख होत आहे.
आमचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील तसेच प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत समाजकारणाबरोबर साईसेवेचे व्रत यापुढेही अखंड सुरूच ठेवणार आहे. आजवर जीवनात द्वेषाच्या राजकारणाला कधीही थारा दिला नाही. साईबाबांचे आशिर्वाद आणि न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असल्याने सत्य जनतेसमोर येणार आहे
राहाता न्यायालयात जामीन झाल्यानंतर विजय कोते यांच्या जल्लोषाच्या घोषणांनी न्यायालयाबाहेरील परिसर दणाणून गेला होता. न्यायालयाच्या बाहेर आल्यानंतर कोते यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. साईनिर्माणच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत केले. दुपारनंतर शिर्डी येथील निवासस्थानी चाहत्यांनी गर्दी केली होती.