Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेशकरुरमधल्या चेंगराचेंगरीनंतर अभिनेता विजय थलापतीची पहिली प्रतिक्रिया; तर डीजीपींनी चेंगराचेंगरीचं सांगितलं खरं...

करुरमधल्या चेंगराचेंगरीनंतर अभिनेता विजय थलापतीची पहिली प्रतिक्रिया; तर डीजीपींनी चेंगराचेंगरीचं सांगितलं खरं कारण

मुंबई | Mumbai
तामिळनाडूचे अभिनेता आणि राजकारणात नुकतेच सक्रीय झालेले टीव्हिकेचे नेते विजय थलापती यांच्या करूर येथील रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली. या भीषण चेंगराचेंगरीमध्ये तब्बल ३९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. विजय थलापती यांनी या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपले दु:ख व्यक्त केले आहे.

विजय थलापती यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, की, ‘खूप दु:ख झाले आहे. मी ज्या वेदना आणि दु:खाचा अनुभव घेत आहे ते समजण्यापलिकडे आहे. करूरमध्ये जीव गमावलेल्या आमच्या प्रिय बंधू आणि बहिणींच्या कुटुंबियांना मी माझ्या मनापासून संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो. जखमींनी लवकर बरे व्हावे, यासाठी मी प्रार्थना करतो’.

- Advertisement -

चेंगराचेंगरीचे कारण डिजीपींनी सांगितलं
विजय थलापतीच्या रॅलीमध्ये हजारो लोक जमा झाले होते. या रॅली दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली, या घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला, तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश तामिळनाडू सरकारने दिले आहेत. मात्र, चेंगराचेंगरीची घटना नेमके कशामुळे घडली? याचे धक्कादायक कारणे तामिळनाडूचे प्रभारी डीजीपी जी. वेंकटरमण यांनी सांगितली आहेत. ‘थलापती विजय रॅलीच्या ठिकाणी तब्बल ७ तास उशीरा पोहोचला, त्यामुळे अचानक समर्थकांची गर्दी वाढली, या रॅलीसाठी लोक सकाळी ७ वाजल्यापासून उभे होते. मात्र, त्या लोकांना पुरेसे पाणी आणि अन्न देखील मिळाले नाही’, असे प्रभारी डीजीपींनी म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे.

YouTube video player

“विजयला या रॅलीला पोहोचण्यास तब्बल सात तास उशीर झाला आणि त्यामुळे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच आयोजकांनी अपेक्षित लोकांची संख्या १०,००० असल्याचे सांगितले होते. मात्र, २७,००० लोकांनी या रॅलीत सहभाग घेतला. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. या रॅलीसाठी ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. थलपती विजयच्या आधीच्या रॅलींमध्ये गर्दी कमी होती. पण यावेळी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त गर्दी होती”, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी जी वेंकटरमण यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या